Aloo Tikki: संध्याकाळच्या नाश्त्यात काही चटपटीत खायचं असेल तर बनवा आलू टिक्की, सोपी आहे रेसिपी-how to make aloo tikki recipe for evening snacks ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Aloo Tikki: संध्याकाळच्या नाश्त्यात काही चटपटीत खायचं असेल तर बनवा आलू टिक्की, सोपी आहे रेसिपी

Aloo Tikki: संध्याकाळच्या नाश्त्यात काही चटपटीत खायचं असेल तर बनवा आलू टिक्की, सोपी आहे रेसिपी

Aug 20, 2024 06:43 PM IST

Evening Snacks Recipe: तुम्ही या पावसाळ्यात संध्याकाळी चहासोबत चटपटीत रेसिपी ट्राय करण्याचा विचार करत असाल तर आलू टिक्कीची ही टेस्टी रेसिपी बनवा.

आलू टिक्की
आलू टिक्की (unsplash)

Aloo Tikki Recipe: संध्याकाळची थोडीशी भूक शांत करण्यासाठी काहीतरी चविष्ट आणि कुरकुरीत ट्राय करायचं असेल तर चहासोबत आलू टिक्कीची ही टेस्टी रेसिपी बनवू शकता. आलू टिक्कीची ही रेसिपी तुमची स्ट्रीट फूडची क्रेविंग तर शांत करेलच शिवाय पावसात बाहेरचे पदार्थ टाळण्याची संधीही देईल. त्यामुळे तुम्ही या पावसाळ्यात संध्याकाळी चहासोबत चटपटीत रेसिपी ट्राय करण्याचा विचार करत असाल तर आलू टिक्कीची ही टेस्टी रेसिपी नोट करा. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या आलू टिक्कीची रेसिपी

 

आलू टिक्की बनवण्यासाठी साहित्य

- ४ उकडलेले बटाटे

- २ टेबलस्पून कॉर्न फ्लोर

- १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट

- २ हिरव्या मिरच्या

- २-३ टेबलस्पून कोथिंबीर

- १/२ टीस्पून जिरे पूड

- १/२ टीस्पून चाट मसाला

- १/४ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

- २ टेबलस्पून पुदिना

- १/२ टीस्पून आमचूर पावडर

- तेल तळण्यासाठी

- मीठ चवीनुसार

आलू टिक्की बनवण्याची रेसिपी

आलू टिक्की बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळून घ्या. थंड झाल्यावर त्याचे साल काढून किसून एका भांड्यात ठेवा. आता या भांड्यात हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले मिक्स करा. आता मिश्रणात जिरे पूड, आमचूर पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर यात चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, २ टेबलस्पून कॉर्न फ्लोर घालून बटाट्याबरोबर चांगले मिक्स करा. जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोर नसेल तर तुम्ही त्यात तांदळाचे पीठ किंवा पोह्याचा चुरा देखील घालू शकता. आता हे मिश्रण हाताने चांगले मॅश करून मऊ करा. 

आता हाताला तेल लावून बटाट्याच्या थोड्या मिश्रणाचा गोळा बनवा. ते हलकेच दाबून त्याची टिक्की तयार करा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात आलू टिक्की डीप फ्राय करा. आलू टिक्कीचा रंग सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुमची चवदार आलू टिक्की तयार आहे. गरमा गरम टिक्की चहा, सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता.