Ways to Use Ginger For Weight Loss: हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला सगळ्यांनाच आवडतो. लोक थंडीपासून वाचण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी चहामध्ये आले घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का चहामध्ये आले टाकल्याने फक्त सर्दी- खोकल्यापासून संरक्षण होत नाही तर याच्या नियमित सेवनाने तुम्ही लठ्ठपणा सहज कमी करू शकता. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे तुमची भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करतात. आल्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म वजन कमी करण्यासोबतच ब्लोटिंग, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत. वाढत्या वजनाची समस्या दूर करण्यासाठी आल्याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.
आल्याचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे आल्याचे ड्रिंक बनवण्यासाठी आल्याच्या रसात लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. हे ड्रिंक प्यायल्याने शरीर हायड्रेट तर राहतेच शिवाय रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते.
आले आणि काळी मिरी एकत्र सेवन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. हे बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात किसलेले आले घाला. नंतर त्यात काळी मिरी पावडर टाकून पाणी उकळा. आता हे पाणी एका कपमध्ये गाळून त्यात मध टाकून प्या.
वजन कमी करण्यासाठी लोक सहसा ग्रीन टी पितात. पण जर तुम्ही ग्रीन टी आणि आले एकत्र करून प्यायले तर वेट लॉस होण्यास गती मिळते. हे ड्रिंक बनवण्यासाठी ग्रीन टीमध्ये आल्याचे काही तुकडे टाकून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने फायदा होतो.
आल्याच्या रसात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने देखील वेट लॉसमध्ये फायदा होतो. हा उपाय करण्यासाठी आल्याचा हर्बल चहा बनवा. त्यात एक ते दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्या.
- आल्यामध्ये एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचा गुणधर्म असतो. हे कंबर आणि नितंबांवर जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
- आल्यामध्ये फेनोलिक कंपाऊंड असते. या कंपाऊंडमध्ये अँटी ओबेसिटी गुणधर्म आहेत, जे तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यात मदत करू शकतात.
- आल्याचे सेवन केल्याने भूक लागण्याची इच्छा कमी होते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या