Tips to Check Adulterated and Pure Ghee: दिवाळीची तयारी उत्साहात सर्वत्र सुरु आहे. घराची साफसफाई करण्यापासून तर सामानाच्या खरेदीपर्यंत महिलांची जोरदार तयारी सुरु आहे. दिवाळीच्या फराळातील विविध पदार्थ बनवण्यासाठी तूपाचा वापर केला जातो आणि यासाठी बाजारातून तूप विकत आणले जाते. पण बाजारात मिळणारे तूप अनेकदा भेसळयुक्त असते. अशा परिस्थितीत शुद्ध आणि भेसळयुक्त तूप ओळखणे गरजेचे आहे. कारण भेसळयुक्त तूप आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुम्ही बाजारातून खरेदी केलेले तूप घरी आणत असाल तर ते खाण्यापूर्वी या पद्धतींचा वापर करून त्याची शुद्धता सुनिश्चित करा.
तुपाची शुद्धता ओळखण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुपाचे काही थेंब हातात घेऊन ते चोळा म्हणजे तूप वितळेल आणि हातावर पसरेल. नंतर या तुपाचा वास घ्या. १ तासानंतरही हातातून तुपाचा वास येत असेल तर तूप शुद्ध आहे. कारण नकली तुपाचा वास काही वेळाने निघून जातो आणि हातावर फक्त त्याचा चिकटपणा राहतो.
देशी तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. पण यातून फक्त तूपात मिसळलेले नारळाचे तेल ओळखता येते. बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक तुपांमध्ये खोबरेल तेलाची भेसळ केली जाते. हे जाणून घेण्यासाठी काचेच्या बरणीत तूप घेऊन डबल बॉइल करा. नंतर फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजच्या थंडपणामुळे खोबरेल तेल आणि तुपाचे वेगवेगळे थर घट्ट होतात.
FSSAI नुसार या पद्धतीचा वापर करून देशी तूपात जर वनस्पती तेल किंवा मार्जरीनची भेसळ आहे की नाही हे ओळखता येते. सर्वप्रथम टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा वितळलेले तूप ठेवा. समान प्रमाणात हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि चिमूटभर साखर मिसळा. एक मिनिट ढवळा. काही वेळाने ढवळल्यानंतर तुपात लाल रंगाचे कण दिसू लागतात. म्हणजे देशी तुपामध्ये वनस्पती तुपाची भेसळ केलेली आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)