Onion Kachori Recipe: काही दिवसात होळीचा सण येणार आहे. रंगांचा हा सण आणखी खास बनवण्यासाठी अनेक ठिकाणी पार्टी केली जाते. यासाठी महिला आधीपासून अनेक पदार्थ बनवून ठेवतात. अशी एक डिश म्हणजे कांदा कचोरी. कांदा कचोरी फक्त चवीलाच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. त्याची चव डाळ आणि बटाट्याच्या कचोरीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि चविष्ट आहे. तुम्हाला होळीसाठी काहीतरी चटपटीत स्नॅक्स बनवायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची टेस्टी कांद्याची कचोरी.
- २०० ग्रॅम मैदा
- ३ चमचे बेसन
- २ ते ३ मध्यम कांदे तुकडे केलेले
- २ -३ हिरवी मिरची
- ४ उकडलेले बटाटे
- २ चमचे कोथिंबीर
- १ टीस्पून तेल
- दीड चमचे काश्मिरी लाल तिखट
- दीड टीस्पून चाट मसाला
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १/२ टीस्पून ओवा
- ५ ते ६ टीस्पून तेल
- १ चमचा काळे मीठ
- १/२ टीस्पून हिंग
- मीठ चवीनुसार
कांदा कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल, कोथिंबीर आणि हिंग घालून मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवा. यानंतर पॅनमध्ये बेसन, तिखट, काळे मीठ, चाट मसाला आणि गरम मसाला घालून आणखी काही मिनिटे परतून घ्या. आता कढईत चिरलेला कांदा, मीठ आणि हिरवी मिरची घालून कांदा मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर बटाटे घालून सर्व चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
कचोरीचे पीठ तयार करण्यासाठी मैदा, ओवा, मीठ आणि तेलाच्या मदतीने मऊ पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर ओल्या कपड्याने झाकून अर्धा तास तसंच ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर मळलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे बनवा. त्यात कांदा आणि बटाट्याच्या मिश्रणाचे सारण भरा आणि चारही बाजूने नीट बंद करून कचोऱ्या हाताने लाटून घ्या. कचोरी मध्यम-मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत तळा. तुमची टेस्टी कांद्याची कचोरी तयार आहे.
संबंधित बातम्या