What causes urine retention: रोड ट्रिप असो किंवा ऑफिसमधली मीटिंग, अनेकदा या प्रसंगी लोक तासनतास लघवी रोखून बसतात. पण हे करत असताना नकळत आपल्या आरोग्याचं किती नुकसान होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे ऐकून तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटेल किंवा तुम्हीही असं काही तरी अनेक प्रसंगी केलं असेल. लघवी थांबवल्याने शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. अशाच काही दुष्परिणामांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या वयानुसार लघवी रोखून ठेवण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, लहान मुलांचे मूत्राशय केवळ १ ते २ तास लघवी थांबवू शकते. पण जेव्हा ते थोडे मोठे होतात, तेव्हा त्यांची लघवी रोखून ठेवण्याची क्षमता २-४ तासांपर्यंत वाढते. त्याच वेळी, एक प्रौढ व्यक्ती जास्तीत जास्त ६ ते ८ तास लघवी रोखू शकते. मूत्राशयात लघवी धरून ठेवण्याच्या क्षमतेचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने इतका वेळ लघवी रोखून ठेवावी. यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. मूत्राशयात जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने एखाद्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी.
जास्तवेळ लघवी थांबवल्याने तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.असे अनेकवेळा दिसून आले आहे की, लघवी थांबल्याने शरीरातील फिल्ट्रेशन बिघडते आणि त्यानंतर किडनीशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. अनेक वेळा लघवी थांबल्यानेही पोटाच्या खालच्या भागात प्रचंड वेदना होतात.
लघवी थांबल्याने मूत्राशयावरही वाईट परिणाम होतो. वास्तविक, मूत्राशयातच मूत्र जमा होते. यामध्ये शरीरातील अनेक अशुद्ध पदार्थ असतात जे वेळेत लघवीद्वारे काढून टाकले नाहीत तर मूत्राशय खराब होण्याची शक्यता असते. लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने मूत्राशयावर दाब पडतो, ज्यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात आणि ते फुटण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे लघवी रोखून धरणे शक्यतो टाळावे.
यूटीआय ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. जी बऱ्याच कारणांमुळे उद्भवते, त्यापैकी एक म्हणजे लघवी रोखून धरणे होय. वेळेवर लघवी न केल्याने बॅक्टेरिया वाढण्यास संधी मिळते, जी मूत्राशयाच्या आतदेखील पोहोचू शकते. हा संसर्ग वाढला की अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जर आपल्याला वारंवार यूटीआयची समस्या असेल तर वेळेवर लघवी करा आणि आपण पुरेसे पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करा.
वृद्ध व्यक्तींना जेव्हा लघवीवर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. पण नियमित लघवी बंद केल्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. म्हणूनच, नियमितपणे लघवी थांबविल्यामुळे मूत्राशय कमकुवत होऊ शकते. ज्यामुळे लघवी गळती किंवा लघवी थांबवण्यास असमर्थता येण्याची समस्या उद्भवू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)