मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Care Tips: आंघोळीपासून व्यायामापर्यंत, हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी हिवाळ्यात अशी घ्यावी काळजी

Winter Care Tips: आंघोळीपासून व्यायामापर्यंत, हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी हिवाळ्यात अशी घ्यावी काळजी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 30, 2024 10:54 AM IST

High Blood Pressure: मधुमेह, दमा आणि हृदयाच्या रुग्णांप्रमाणेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही हिवाळ्यात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये स्वतःची कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी हिवाळ्यात घ्यावयाची काळजी
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी हिवाळ्यात घ्यावयाची काळजी (unsplash)

Winter Care Tips for High Blood Pressure Patients: थंडीचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते. दमा, मधुमेह, लो इम्युनिटी, सांधेदुखी आणि हार्टच्या रुग्णांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हिवाळा धोकादायक ठरू शकतो. वास्तविक, उन्हाळ्यात उच्च रक्तदाब कमी होऊन हिवाळ्यात वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका होण्याची भीती असते. थंडी अचानक वाढल्यामुळे हाय बीपीचा त्रास असलेल्या रुग्णांनी आपली काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.

आंघोळ करताना करू नका ही चूक

हाय बीपीच्या रुग्णांमध्ये हिवाळ्यात धमन्या आणि रक्तवाहिन्या खूप आकसतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो. आणि परिणामी रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका. अचानक अंगावर थंड पाणी टाकल्याने रक्तवाहिन्यांना धक्का बसतो आणि त्या झपाट्याने आकसतात. त्यामुळे हृदय जलद पंपिंग सुरू होते आणि रक्तदाबही वाढतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा धोका वाढू लागतो.

व्यायाम करताना काळजी घेणे आवश्यक

हिवाळ्यात शारीरिक हालचाली लक्षणीय प्रमाणात कमी होतात. पण निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी व्यायाम करताना विशेष काळजी घ्यावी. नियमितपणे आणि माफक प्रमाणात केलेला व्यायाम प्रभावी असतो आणि हृदयाला रक्त सहज पंप करण्यास मदत करतो. खूप मेहनत करावी लागेल असे व्यायाम करणे टाळा. नुसते अर्धा तास चालणे देखील निरोगी राहण्यास मदत करेल. व्यायाम करताना विशेष काळजी घ्यावी.

कमी कपडे घालू नका

कडाक्याच्या थंडीत फक्त एक लोकरीचे स्वेटर किंवा जॅकेट घातल्याने थंडी थांबत नाही. अशा परिस्थितीत स्वेटर अनेक स्तरांमध्ये घातले पाहिजेत. असे केल्याने सर्दी होण्यापासून बचाव होतो. कपड्याच्या अनेक थरांमुळे बाहेरून येणारी थंड हवा अडकते आणि शरीरातील उष्णता कमी करू शकत नाही. त्यामुळे थंडी जाणवत नाही आणि रक्तदाबावर कमी परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

 

दारूपासून दूर राहा

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर हिवाळ्यात दारू पिणे बंद करा. दारूमुळे शरीरातील उष्णता झपाट्याने कमी होते. आणि शरीराचे तापमान कमी असल्याने थंडी जास्त जाणवते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel