Eye Infection: डोळ्यांना होतात विविध प्रकारचे हे संसर्ग, जाणून घ्या कसा करावा प्रतिबंध-here are different types of eye infections know how to prevent them ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Infection: डोळ्यांना होतात विविध प्रकारचे हे संसर्ग, जाणून घ्या कसा करावा प्रतिबंध

Eye Infection: डोळ्यांना होतात विविध प्रकारचे हे संसर्ग, जाणून घ्या कसा करावा प्रतिबंध

Sep 25, 2024 08:21 PM IST

Eye Care Tips: आरोग्याची काळजी घेण्यासोबतच आपल्या डोळ्यांची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. डोळ्यांना कोणकोणत्या प्रकारचे संसर्ग होतात आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा हे जाणून घ्या.

Eye Care Tips: डोळ्यांचे संसर्ग
Eye Care Tips: डोळ्यांचे संसर्ग (unsplash)

Different Types of Eye Infection: आपल्या सभोवतालचे जग जाणून घेण्यासाठी डोळे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आणि निगा राखणे संपूर्ण आरोग्यासाठीच अत्यंत महत्त्वाचे असते. डोळ्यांना कोणत्या प्रकारचा संसर्ग होऊ शकतो आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड येथील डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटलचे ओफ्थलमॉलॉजी कन्सल्टंट आणि कैटरेक्ट सर्जन डॉ. सोनल ईरोले यांनी डोळ्यांचे विविध संसर्ग आणि त्याला प्रतिबंध करण्याचे उपाय सांगितले आहेत.

डोळ्यांचे विविध प्रकारचे संसर्ग

डोळे येणे (कंजंक्टिव्हायटिस)

डोळे येणे किंवा कंजंक्टिव्हायटिस हा सामान्यपणे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार बहुधा पावसाळ्यात होतो. या आजारात डोळे लाल होतात, डोळ्यांमध्ये कंड येते आणि डोळ्यातून चिकट स्त्राव बाहेर पडतो. एलर्जिक कंजंक्टिव्हायटिसमध्ये एखाद्या एलर्जेन म्हणजे एलर्जीस कारणीभूत असलेल्या घटकामुळे कंजंक्टिव्हायटिस होतो. याचीही अशीच लक्षणे असतात. आय ड्रॉप्स आणि कोल्ड कम्प्रेस (डोळ्यांवर ठेवायची थंड पट्टी) यामुळे कंजंक्टिव्हायटिसपासून आराम मिळतो.

रांजणवाडी

रांजणवाडी वेदनादायक असते. यात पापणीच्या कडेला लाल रंगाची पुरळ येते. एखाद्या तैलग्रंथीमध्ये झालेल्या जीवाणूच्या संसर्गामुळे रांजणवाडी येते. ओलसर, आर्द्र वातावरण हे जीवाणूंच्या वाढीस पोषक असते. अशा वातावरणात रांजणवाडी येते. रांजणवाडी आल्यावर डोळ्याला सूज येते, डोळे लालसर होतात आणि चुरचुरतात.

डोळे शुष्क होणे

धूळ, वारा आणि एसी हे घटक एकत्र असतील तर अश्रू निर्मितीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळे चुरचुरतात, लालसर होतात आणि जळजळ होते. अशा वेळी डोळे चोळू नयेत.

कॉर्नियामध्ये होणारा अल्सर

कॉर्नियामध्ये होणाऱ्या अल्सरमध्ये जीवाणू, विषाणू किंवा बुरशीचा संसर्ग होऊन कॉर्नियामध्ये वेदनादायक फोड येतात. डोळ्यांमध्ये वेदना होणे, डोळे लालसर होणे, प्रकाशाचा त्रास होणे आणि दृष्टी धुसर होणे ही याची लक्षणे आहेत. दृष्टी जाऊ नये यासाठी या आजारावर तत्काळ उपचार करणे गरजेचे असते.

लेन्सेस किंवा स्टेरॉइड्स

हा एक सामान्यपणे होणारा संसर्ग आहे. हा डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याचा आजार आहे. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा इजा झालेल्या डोळ्यावर स्टेरॉइडचे ड्रॉप्स घातल्यास हा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सेस त्यांच्या वापरासंदर्भात दिलेल्या शिफारसीनुसार वापरणे आणि कॉन्टॅक्ट लेन्स घातले असतील तर चेहरा धुणे किंवा ते घालून पोहणे टाळावे.

डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टिप्स

स्वच्छता - हात वारंवार धुवावे आणि अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नये.

डोळ्यांचे संरक्षण - धूळ किंवा दूषकांपासून संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस किंवा गॉगल घालावा.

आय ड्रॉप्स - डोळ्यातील ओलावा कायम ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्हरहीत लुब्रिकंट ड्रॉप वापरावे.

वैयक्तिक वस्तू - टॉवेल, रुमाल किंवा डोळ्यांच्या मेकअपचे सामान शेअर करू नये.

वैद्यकीय मदत - डोळ्याला त्रास झाल्यास किंवा सामान्य नसणारी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग