Why you Crave For Sweets: अलीकडच्या काळात लोकांची जीवनशैली प्रचंड बदलली आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खानपानाच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. शिवाय लोक आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात सजग झाले आहेत. त्यामुळेच त्यांना आरोग्याबाबत किंवा आहाराबाबत अनेक प्रश्न पडत असतात. त्यातीलच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गोड खायची इच्छा का होते? बहुतांश लोकांना सतत चॉकलेट असो किंवा एखादी मिठाई असे गोड पदार्थ खाण्याची प्रचंड इच्छा होत असते. याबाबत तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं आहे, ते आपण आज जाणून घेणार आहोत. शिवाय बदलत्या ऋतूनुसार कोणता आहार घ्यावा हेदेखील त्यांनी सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही लोक त्यांना विचारतात की, अलीकडे जेवल्यानंतर गोड काहीतरी खाण्याची इच्छा त्यांना होते. किंवा दिवसभरात कधीही एखादा गोड पदार्थ खाऊ वाटतो. तर असं नेमकं का होतं? याबाबत उत्तर देताना तज्ज्ञ सांगतात की, बहुतांश वेळा हार्मोनल असंतुलन, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि पाचन तंत्र कमजोर होणे. यामुळे शरीरातील सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे मेंदूला एखादी विशिष्ट गोष्ट खाण्याचा संदेश मिळतो. साधारणपणे, अशा परिस्थितीत, एखाद्याला कार्बोहायड्रेट किंवा काहीतरी गोड खावेसे वाटते. ज्यामुळे शरीरात आनंदी हार्मोन सेरोटोनिनचा स्राव वाढतो. अनेक वेळा शरीरात काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे काही विशिष्ट गोष्टी खाव्याशा वाटतात.
जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा काहीतरी गोड खावेसे वाटते. विशेषतः चॉकलेट. जर तुम्हाला चॉकलेट वारंवार खावेसे वाटत असेल तर अशा परिस्थितीत तुमच्या आहारात बदाम, काजू आणि सूर्यफुलाच्या बियांचा नियमित समावेश करा. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांना समावेश केल्याने शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता दूर होईल. त्यामुळे गोड खाण्याची इच्छाही कमी होईल. शरीरात प्रथिनांचे पुरेसे प्रमाण राखण्यासाठी आहारात अंडी, दूध, मांस आणि मोड आलेले कडधान्ये यांचा नियमित समावेश करा. तसेच फळे आणि कडधान्ये नियमितपणे खावा.
नियमित संतुलित आहार घेतल्यानेच तुमची गोड खाण्याची लालसा कमी होऊ शकते हे लक्षात ठेवा. क्रेव्हिंग्जवर नियंत्रण ठेवण्यासाठी, जेवणानंतर हळू हळू गुळाचा तुकडा खा किंवा खजूर खावा. जर तुम्हाला खूप गोड खावेसे वाटत असेल तर जेवणानंतर अर्ध्या तासाने एक कप कोमट पाणी किंवा ग्रीन टी प्या. लालसा नियंत्रित करण्यास मदत होईल. अशाप्रकारे हळूहळू प्रयत्न करून गोड खाण्याच्या इच्छेवर ताबा मिळवता येऊ शकतो. अशाने तुमचे वजनही नियंत्रणात राहील आणि गोड खाल्ल्याने होणाऱ्या समस्याही उद्भवणार नाही.
तज्ज्ञांच्या मते, बदलत्या ऋतूनुसार आपल्या खाण्याच्या सवयीही बदलल्या पाहिजेत. पावसाळ्यात खाण्याच्या सवयींशी संबंधित काही नियम आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत जेणेकरून बॅक्टेरिया आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू नयेत.उन्हाळ्यात टरबूज आणि काकडीसारखे भरपूर पाणी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे पावसाळ्यात बेसन, कॉर्न आणि कोरड्या भाज्या यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करा. सहजपणे पचतील असे पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवा. कारण या ऋतूमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे पचनसंस्था थोडी मंदावलेली असते. त्याचप्रमाणे आपल्या आहारातील मसाल्यांचे प्रमाण कमी करा.
या ऋतूत आंबट पदार्थांचे सेवन कमी करा. कारण या ऋतूमध्ये संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सर्वात कमी असते. आपल्या आहारात लसूण, कांदा, हळद, मेथीदाणे आणि कारले यांसारख्या गोष्टींचा नियमित समावेश करा. या ऋतूत सॅलड्स आणि हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)