Which fruits are high in vitamin C: आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. या जीवनसत्त्वांची आपापली विविध कार्ये आहेत. शरीरात यापैकी कोणत्याही व्हिटॅमिनची कमतरता असल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ऍसिडदेखील म्हणतात. हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते आणि आपल्या शरीराला धोकादायक असलेल्या फ्री रेडिकल्सपासून वाचवते. आहारात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने शरीराला होणारा संसर्ग टाळता येतो.
आहारतज्ज्ञांच्या मते, लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन सी असते, जे शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. अनेक भाज्यांमध्येदेखील व्हिटॅमिन सी असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे जीवनसत्व सर्वात महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी आंबट फळांचे भरपूर सेवन करणे आवश्यक आहे. आज आपण कोणत्या फळांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते हे जाणून घेणार आहोत.
संत्री हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये सुमारे ७० मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते आणि त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. संत्र्यामध्ये फायबर असते, जे पोटाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे आहारात संत्रीचा समावेश असल्यास उत्तम समजले जाते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. एक कप पपईमध्ये ८८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. पपईमध्ये अँटी इन्फ्लीमेंटरी गुणधर्म देखील आहेत आणि ते पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर असतात. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी पपई हा रामबाण उपाय मानला जातो.
बहुतांश लोकांना माहिती नसेल पण, पेरूदेखील व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. एका पेरूमध्ये २२८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे रोजच्या गरजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. याशिवाय पेरूमध्ये फायबर, पोटॅशियम आणि इतर महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात.
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले किवी तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते. एका किवीमध्ये सुमारे ९२ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे दररोजच्या गरजेला जवळपास १००% पूर्ण करते. किवीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के देखील असतात, जे आश्चर्यकारक आरोग्य फायदे देतात.
स्ट्रॉबेरी हादेखील व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये ८९ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरी हा उत्तम चवीसोबतच आरोग्याचा खजिना मानला जातो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)