Correct Way To Eat Almonds: वाढत्या मुलांचा मानसिक विकास असो किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेणे असो, घरातील वडीलधारी मंडळी रोज नाश्त्यात भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला देतात. इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत बदामात सर्वाधिक पोषक घटक असतात. बदामाच्या नियमित सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, सेलेनियम, कॉपर, नियासिन, लोह आणि मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारात बदामाचा समावेश करतात.
परंतु बहुतांश लोकांना माहिती नाही की, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या शारीरिक गरजेपेक्षा कमी बदाम खाल्ले तर त्याला त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीने आवश्यकतेपेक्षा जास्त बदाम खाल्ले तर त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अशा परिस्थितीत, बदाम खाण्यापूर्वी, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वयानुसार योग्य प्रमाण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून त्यांना पूर्ण लाभ मिळावा आणि दुष्परिणाम होऊ नयेत. बदाम उष्ण असल्यामुळे त्याचे योग्य सेवन न केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
अनेक आरोग्य अहवाल प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे ३० ग्रॅम, म्हणेजच जवळपास २३ बदाम खाण्याची शिफारस करतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषकतत्वे पुरवण्यासाठी बदामांची ही मात्रा पुरेशी आहे. या प्रमाणात बदाम खाल्ल्याने प्रौढ व्यक्तीला कोणतेही नुकसान होत नाही. उलट त्यांना बदामातील पोषक तत्वांचा फायदाच मिळतो.
तज्ज्ञांच्या मते, भारतासारख्या उष्ण देशात माणसाने रोज ४-५ पेक्षा जास्त भिजवलेले बदाम खाऊ नयेत. बदामाचे नियमित सेवन हृदय, मेंदूचे विकार, त्वचा आणि केसांचे आरोग्य, मधुमेह, खोकला, श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा यांवर फायदेशीर ठरते. त्याचबरोबर बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठता, त्वचाविकार आणि जास्त घाम येणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीराच्या गरजेनुसार बदाम खाणे अत्यंत सोयीचे ठरते.
एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक बदाम खातात त्यांचे वजन बदाम न खाणाऱ्या लोकांपेक्षा वेगाने कमी होते. कारण बदामामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. बदामामध्ये असलेल्या मोनोसॅच्युरेटेडसारख्या निरोगी फॅटमुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेऊन कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तर बदामातील प्रथिने स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ होण्यास मदत करतात. जे तुमचे वजन हेल्दी राखण्यास मदत करते.
मुलांसाठी सुमारे १० बदाम पुरेसे आहेत. मुलांना दररोज १० भिजवलेले बदाम खायला दिल्यास त्यांना पुरेसे प्रथिने मिळू शकतात. जेणेकरून त्यांची वाढ उत्तमरीत्या होण्यास मदत होते.
आरोग्यासाठी बदामाचे संपूर्ण फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही बदाम कच्चेही खाऊ शकता. बदाम खाण्याचा हा सर्वात सोपा आणि आरोग्यदायी मार्ग आहे. कच्च्या बदामामध्ये नैसर्गिक तेल आणि पोषक तत्वे जतन केली जातात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
परंतु बहुतांश लोक, बदाम खाण्यासाठी हा दुसरा मार्ग पसंत करतात. या पद्धतीत बदाम रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले जातात. बदाम खाण्याच्या या पद्धतीमुळे बदाम लवकर पचण्यास मदत होतेच पण त्यामध्ये पोषक तत्वांची उपलब्धता देखील वाढते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)