Heart Attack and Stroke: रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयाला नेहमीपेक्षा अधिक कार्य करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्यावर होतो. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील कन्सल्टंट कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी उच्च रक्तदाबाचा हृदयावर कसा परिणाम होतो हे सांगितले.
उच्च रक्तदाब हळूहळू तुमचे हृदय, रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवू शकतो. अनेक लोकांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. ही परिस्थिती अचानक उद्भवू शकते आणि त्यामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम निर्माण करू शकतात. उच्च रक्तदाब हे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम करु शकते. त्यावर वेळीच उपचार केल्यास रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते.
उच्च रक्तदाब हा अनेकदा सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला याची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत व हळूहळू ते तुमचे नुकसान करते. जेव्हा तुमचा रक्तदाब वाढतो, तेव्हा ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर, विशेषतः धमन्यांवर अतिरिक्त दबाव टाकते. दीर्घकाळापर्यंत हा सततचा दाब रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद करू शकतो. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राखण्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कालांतराने, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी (प्लेक) जमा होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. जर हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाबाने जर मेंदूच्या कार्यात बिघाड झाला तर त्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. यामुळे तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो आणि हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागू शकते, व कालांतराने ते कमकुवत होऊ शकते. याव्यतिरिक्त रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा मेंदूतील लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच तुमचे आरोग्य चांगले राहावे याकरिता तुमच्या रक्तदाबाच्या पातळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
बीपी मशीनच्या मदतीने तुमच्या रक्तदाबाच्या पातळीचे नियमित निरीक्षण करून हे साध्य करता येते. निरोगी हृदयासाठी योग्य जीवनशैलीचा अवलंब करा. संतुलित आहाराचे सेवन करा. सोडियमचे सेवन मर्यादित करा. प्रक्रिया केलेले किंवा पॅकेज्ड फुडचे सेवन टाळा. सक्रिय जीवनशैली बाळगा आणि तणावाचे व्यवस्थापन करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या