Lemongrass Herbal Tea: आपल्या देशामध्ये प्रचंड चहाप्रेमी पाहायला मिळतात. प्रत्येक व्यक्ती दिवसातून किमान ३ वेळा तरी चहा घेतच असेल हे नक्की. चहा शरीरासाठी हानिकारक आहे असे कित्येकदा सांगूनसुद्धा अनेकांना चहा सोडणे शक्य होत नाही. शिवाय चहामुळे वजन वाढते, पित्त होते, विविध आजार बळावतात. मात्र या चहाप्रेमींसाठी चहामध्ये एक हेल्थी पर्याय आज आम्ही सांगणार आहोत. तसे तर चहाचे विविध प्रकार आता पाहायला मिळतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे लेमन ग्रास टी होय. या चहाच्या सेवनाने तुम्हाला अनेक लाभदायक परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वच प्रकाराचा चहा शरीरासाठी घातक असतो असे नाही. तर हा चहा तुमच्या आरोग्यासाठी चमत्कारिक सिद्ध होईल.
आपल्या इथे बहुतांश घरांमध्ये सकाळची सुरुवात ही चहाने होते. मात्र हा चहा रिकाम्या पोटी पिणे हानिकारक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आरोग्याच्या फायद्यासाठी चहा प्यायचाच असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी लेमनग्रास टी घेऊ शकता. होय, लेमन ग्रासमध्ये कॅल्शियम, झिंक, लोह, फोलेट(फोलासीन व्हिटॅमिन), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हा चहा रिकाम्या पोटी प्यायल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. याशिवाय या चहाचे आपल्या आरोग्यासाठी विविध फायदे आहेत. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
अनेक लोकांना पोटाच्या विविध तक्रारी असतात. विविध उपाय करूनसुद्धा त्यांना फारसा उपयोग होत नाही. मात्र हा चहा नियमित सकाळी उपाशी पोटी घेतल्यास तुमच्या समस्या दूर होऊ शकतात. शिवाय तुमची पचनक्रिया सुधारू शकते. लेमनग्रासपासून बनवलेला चहा प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. पचनक्रिया सुरळीत झाल्याने पोट फुगणे, गॅस, ऍसिडिटी इत्यादी त्रास कमी होतात. त्यासोबतच या चहाच्या सेवनाने उलट्या, जुलाब आणि पोटदुखीच्या इतर समस्यांपासूनही आराम मिळतो.
सध्याच्या फास्टफूड आणि धावपळीच्या काळात वजन वाढण्याची समस्या बळावत आहे. अशात विविध उपाय करूनही वजन आटोक्यात ठेवण्यास त्रास होतो. अशात लेमनग्रास टी तुम्हाला मदत करू शकते. तज्ज्ञांच्या मते हा चहा प्यायल्याने तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट होतो. आणि चरबी वेगाने बर्न होते. अशा परिस्थितीत या चहाच्या सेवनाने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे हा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे, खानपानाच्या बदललेलया सवयींमुळे सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढेल आहे. अशात हा धोका टाळण्यासाठी लेमनग्रास टी मदत करू शकते. लेमनग्रास चहा प्यायल्याने कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. वास्तविक, लेमनग्रास टीमध्ये अँटीफंगल, अँटी-कॅन्सर, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीडिप्रेसेंट सारखे गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे हा चहा नियमित सेवन केल्यास हा धोका कमी होतो. त्यासोबतच बीपी आणि शुगरसुद्धा आटोक्यात राहण्यास मदत मिळते.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या