what time to sleep at night: कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी सकस आहारासोबत चांगली झोप घेणे आवश्यक आहे. पण, सध्या टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या वापराने लोकांना रात्री जागरण करायलाही शिकवलं आहे. त्यामुळे लोकांचे झोपणे आणि उठणे विस्कळीत झाले आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या शरीराची सर्केडियन रिदम म्हणजेच अंतर्गत चक्राची व्यवस्था बिघडते. त्यामुळे गंभीर आजार सहज बळावतात. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ प्रत्येक व्यक्तीला दररोज ७ ते ८ तास चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. आता प्रश्न असा आहे की, रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? चांगली झोप घेण्याचे काय फायदे आहेत? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये यासंबंधीचे एक संशोधन समोर आले होते. ज्यामध्ये असे आढळून आले की लोकांनी रात्री १० वाजेपर्यंत झोपले पाहिजे. हा अभ्यास यूकेमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ८८००० प्रौढांचा समावेश होता. शिवाय इतर काही अभ्यासदेखील दर्शवतात की रात्री १० ते ११ दरम्यान झोपणे फायदेशीर आहे.
रिपोर्टनुसार, निरोगी राहण्यासाठी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत झोपणे चांगले मानले जाते. मात्र, तुमच्या वैयक्तिक आरोग्यानुसार झोपेची गरज वेगळी असू शकते. इतकेच नाही तर दररोज ठराविक वेळेत अन्न खाल्ल्याने आरोग्यासाठी असंख्य फायदे मिळू शकतात. खाणे, पिणे आणि झोपणे यात सातत्य राखले तर आरोग्य चांगले राखता येते. यामुळे तुमच्या शरीराचे कार्यसुद्धा सुधारते.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्या शरीराची सर्कॅडियन रिदम हे अंतर्गत घड्याळ मानले जाते. हे शरीराचे घड्याळ तुमची झोप नियंत्रित करते. सूर्यास्त होताच आणि अंधार पडू लागला की तुमचा मेंदू झोपेची वेळ झाल्याचे संकेत देतो. सर्कॅडियन रिदम केवळ झोपच नाही तर हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनदेखील नियंत्रित करते. त्यामुळे चांगली झोप अत्यंत गरजेची आहे.
शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढून शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.मानसिक ताण कमी होईल आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.वजन नियंत्रणात राहील, तर रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने वजन वाढू शकते. लवकर झोपल्याने तुमची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारू शकते. लवकर झोपल्याने राग कमी होतो आणि मूड सुधारतो.शरीराला योग्य विश्रांती मिळते, ज्यामुळे थकवा दूर होतो. चांगली झोप शरीरालाच नाही तर मनही निरोगी ठेवते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)