What is Carotid Stenting: क्षणिक इस्केमिक अटॅक (TIA) याला मिनिस्ट्रोक देखील म्हणतात. तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाहात तात्पुरते अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट TIA ला कारणीभूत ठरते. ही लक्षणे थोड्या काळासाठीच टिकतात. सहसा ६० वर्ष वरील वयोगटातील व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते. यामध्ये काही काळासाठी एका बाजूच्या हात आणि पायाची हालचाल होत नाही आणि नंतर पूर्णपणे बरे होते. याबाबत मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांनी माहिती दिली.
याच्या लक्षणांमध्ये तोल जाणे, अचानक भुरकट दिसणे, एका बाजूचे तोंड वाकडे होणे, एक हात निष्क्रिय होणे, स्पष्ट बोलता न येणे आदींचा समावेश होतो. सांकेतिक भाषेत या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. B म्हणजे Balance (संतुलन), E म्हणजे Eyes(दृष्टी धुसर होणे), F म्हणजे Face (चेहरा वाकडा होणे), A म्हणजे Arms (हात निष्क्रिय होणे), S म्हणजे Speech (स्पष्ट बोलता न येणे), T म्हणजे Time (वेळ). काही ठराविक काळानंतर लक्षणे सुधारतात आणि रुग्ण सामान्य होतो. त्यानंतर अशा रुग्णांना क्षणिक इस्केमिक अटॅक (TIA) चे निदान केले जाते. कधीकधी काही लोकांना एका दिवसात २-३ क्षणिक इस्केमिक अटॅक येतात. म्हणून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमन्यांपैकी एकामध्ये गंभीर अडथळा किंवा गंभीर स्टेनोसिस असू शकतो हे एथेरोस्क्लेरोसिसमुळे होते.
जर रुग्णाला वारंवार टीआयए येत असतील तर एमआरआय- अँजिओग्राफी केली जाते. मेंदूमध्ये स्ट्रोक नाही परंतु धमनी पूर्णतः ब्लॉक होत असतील तर कॅरोटीड स्टेंटिंग करून स्ट्रोक टाळता येऊ शकतो. हा स्ट्रोकसाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे. आधीच एखाद्याला स्ट्रोक आला आहे आणि त्याला वारंवार क्षणिक इस्केमिक अटॅक देखील येत असतील, जर ब्लॉकेज ७०% पेक्षा जास्त असेल तर ते कॅरोटीड स्टेंट टाकून उघडले जाते. बर्याच लोकांना क्षणिक इस्केमिक अटॅक नंतर कॅरोटीड स्टेंटिंगची आवश्यकता भासते. काही औषधे आणि अँटीप्लेटलेट्सने देखील व्यवस्थापित केली जातात.
कॅरोटीड स्टेंटिंग कॅथ लॅबमध्ये केली जाते. प्रथम, स्टेनोसिस ७०% पेक्षा जास्त आहे हे तपासण्यासाठी सेरेब्रल डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) केली जाते. यात मांडीचा सांधा, फेमोरल धमनी आणि नंतर कॅथेटर हे पास केले जाते जे धमनीच्या ब्लॉकेजेसकडे जाते. सर्वात आधी ब्लॉकेज ओलांडून एक फिल्टर पास केले जाते. त्यानंतर फुग्याची अँजिओप्लास्टी केली जाते. ज्यामुळे ब्लॉकेज उघडले जाते. ब्लॉकेज उघडल्यानंतर एक स्टेंट ठेवला जातो. ज्यामुळे ब्लॉकेज कायमस्वरूपी उघडते. ही प्रक्रिया करून क्षणिक इस्केमिक अटॅकची पुनरावृत्ती रोखू शकता.
जर एखाद्याला आधीच स्ट्रोक आला असेल तर आपण पुढील स्ट्रोक टाळू शकतो. जेव्हा जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा त्या अडथळ्याचा प्रवाह कमी होऊन पुढील समस्या निर्माण होतात. म्हणून कॅरोटीड स्टेंटिंगद्वारे या समस्या टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळे क्षणिक इस्केमिक अटॅककडे दुर्लक्ष करू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)