Health Care Tips for Kids: उन्हाळी सुट्टी सुरु झाली असून मुलांना या सुट्टीचा आनंद लूटताना चिभेचे चोचले देखील पुरविले जातात. अशावेळी मुलांना रस्त्यावरील उघडे पदार्थ देणे टाळा. कारण त्यामुळे त्यांना टायफॉइड, कावीळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. मुलाच्या खाण्याच्या चांगल्या सवयी लावल्यास भविष्यातील आरोग्यासंबंधी तक्रारींना दूर ठेवता येईल. मुंबई, खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलचे बालरोगतज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अमित पी घावडे यांनी मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबत काही टिप्स सांगितल्या आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थ चाखण्याची संधी मिळते . मात्र त्यांना आवडणारी पाणीपुरी, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा, तळलेले पदार्थ देण्यापुर्वी पालकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. कारण ते ठिकाण अस्वच्छ असू शकते आणि त्यामुळे टायफॉइड, कावीळ आणि जुलाब यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
टायफॉइड ताप हा एक जीवाणूजन्य संसर्ग म्हणून ओळखला जातो, जो मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये साल्मोनेला टायफी बॅक्टेरियामुळे, दूषित अन्न किंवा पाण्यामुळे दिसून येतो. तीव्र ताप, पोटात तीव्र वेदना, डोकेदुखी, जुलाब किंवा बद्धकोष्ठता आणि भूक न लागणे ही त्याची लक्षणे आहेत. कावीळ ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे पडतात. पाणीपुरी तयार करताना वापरल्या जाणाऱ्या दूषित पाण्याला देखील अनेक आजारांना आमंत्रण देते जसे की टायफॉइड.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ जसे की पाणीपुरी, आईसक्रीम आणि चाट सारखे चवीष्ट पदार्थांमुळे टायफॉइड आणि कावीळ सारख्या प्रकरणांची संख्या वाढते आहे. आईस्क्रीम किंवा पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. ज्यामुळे पोटासंबंधी तक्रारी, जुलाब आणि असह्य वेदना, पोटदुखी यासारख्या तक्रारी उद्भवतात.
मुलांना स्ट्रीट फूड देणे टाळणे आणि उन्हाळ्यात आपले मुल निरोगी राहिल याची खात्री करणे गरजेचे आहे. मुलांमध्ये टायफॉइड, कावीळ आणि जुलाब यांसारख्या समस्या आढळल्यास त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितलेली औषधांचे सेवन करा. घरी शिजवलेले पौष्टिक अन्न खा, योग्य स्वच्छता राखा, वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करा आणि जेवण्यापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुवा. जुलाबासारख्या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी, मुलाला तोंडावाटे रीहायड्रेशन सोल्यूशन द्या. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि उन्हाळ्याची सुट्टी आनंदी आणि निरोगी राहिल याची खात्री करा. मुलांना आवडणारे पदार्थ घरी तयार करुन खाऊ घाला, जेणेकरुन तो पदार्थ खाण्याची इच्छा पुर्ण होईल तसेच घरी बनविल्यामुळे मुलांना त्याचा त्रास देखील होणार नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)