Health Benefits of Eating Ghee: तुपाचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी देखील केला जातो. आयुर्वेदात तूपाला औषध म्हणून ओळखले जाते. तूपात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आरोग्यालाच नव्हे तर त्वचा आणि केसांनाही फायदा होतो.
याशिवाय तुपात असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल डॅमेज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासूनही संरक्षण करतात. डॉ. रवी के गुप्ता यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तूप खाण्याचे फायदे सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुपाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते आश्चर्यकारक फायदे मिळतात आणि दिवसभरात तुपाचे सेवन किती करावे.
तूपात असलेल्या हेल्दी फॅटमुळे शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढते. तुपामुळे इतर प्रकारच्या चरबीप्रमाणे हृदयरोग होत नाही.
तूप पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. हे आतड्यांना लुब्रिकेट करून पचन सुधारते. तुपाचे सेवन केल्याने आतडे निरोगी राहतात. ज्यामुळे अल्सर आणि कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
तुपात असलेले ब्युटिरिक अॅसिड शरीराला रोगाशी लढणाऱ्या टी-पेशी तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आतड्यांसंबंधी भिंती मजबूत करण्यासाठी, चयापचय वाढविण्यासाठी आणि आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ब्युटिरिक अॅसिड खूप उपयुक्त आहे.
तूप खाल्ल्याने त्वचेला चमक येते. तूपात असलेले ओमेगा ३ आणि ओमेगा ९ फॅटी अॅसिड मेंदूचे कार्य चांगले करून स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात. तुपाचे सेवन केल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहून त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स त्वचा घट्ट ठेवतात आणि वृद्धत्वापासून तुमचे रक्षण करतात.
रोज एक चमचा गरम तूप खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात गॅस तयार होण्याची समस्या व्यक्तीला सतावत नाही.
दिवसातून १ ते २ चमचे तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. यापेक्षा जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)