Can We Eat Chia Seeds at Night: काळे आणि पांढरे चिया सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या लहान बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. बरेच लोक ते पाण्यात किंवा दुधात टाकून खातात. चिया सीड्समध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, अँटिऑक्सिडेंट्स, तांबे, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा लोक हे खातात. पण ते रोज खाणे योग्य आहे का? आणि ते रात्री खाल्ले जाऊ शकतात का? असे काही प्रश्न लोकांच्या मनात असतात. तुम्हाला सुद्धा हे प्रश्न असतील तर त्याचे उत्तर येथे जाणून घ्या.
चिया सीड्स अधिक पौष्टिक असतात, ते खाल्ल्याने आरोग्यास बरेच फायदे मिळतात. तथापि, जास्त खाल्ल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. अशा वेळी दररोज केवळ २८ ग्रॅम सीड्स खाणे पुरेसे आहे. विशेषत: जर तुम्ही या सीड्स खाण्यास सुरुवात करत असाल तर हळूहळू त्याचे सेवन वाढवता येऊ शकते.
चिया सीड्स पाण्यात किंवा आपल्या आवडीच्या दुधात भिजवण्यास केवळ २० मिनिटे लागतात. भिजल्यानंतर सीड्स जेलीसारख्या स्वरूपात येतात. मग ते तुम्ही तुमच्या आवडत्या पेय किंवा पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.
सकाळी चिया सीड्स खाणे चांगले मानले जाते. विशेषत: रिकाम्या पोटी खाण्याची ही उत्तम वेळ मानली जाते. कारण ते चयापचय वाढवतात आणि दिवसाच्या प्रत्येक जेवणाचे पचन करण्यास मदत करतात. तथापि, काही अहवाल असे म्हणतात की रात्री ते खाल्ल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)