सतत डोकं दुखतंय? औषधाची गरजच नाही, 'या' घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम-headache home remedies what to do if you have a constant headache ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सतत डोकं दुखतंय? औषधाची गरजच नाही, 'या' घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

सतत डोकं दुखतंय? औषधाची गरजच नाही, 'या' घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

Aug 14, 2024 12:02 PM IST

Headache Home Remedies: डोकेदुखीमागे अशी अनेक लहान-लहान कारणे आहेत ज्याच्याकडे आपण फारसे लक्षच देत नाही.

डोकेदुखीवर घरगुती उपाय
डोकेदुखीवर घरगुती उपाय (pixabay)

Headache Home Remedies: आजकाल हवामान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे डोकेदुखी थंड वाऱ्यामुळे होत असावी असे आपण गृहीत धरतो. तर अनेकदा आपल्याला अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. हे कशामुळे होतंय हेदेखील आपल्याला माहित नसते. पण प्रत्यक्षात डोकेदुखीमागे अशी अनेक लहान-लहान कारणे आहेत ज्याच्याकडे आपण फारसे लक्षच देत नाही. जसे की, शरीराला पुरेसे पाणी न पिणे किंवा चांगली झोप न घेणे हे देखील डोकेदुखीचे मुख्य कारण असू शकते. कारण काहीही असो, डोकेदुखी लगेच दूर करणे आवश्यक असते. नाहीतर सर्वच कामे रेंगाळतात. त्यामुळेच आज आपण अशा काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे डोकेदुखी झटपट दूर होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे हे सर्व घरगुती उपाय असल्याने तुम्हाला सतत महागड्या आणि आरोग्यास घातक असणाऱ्या गोळ्या खायची गरजच भासणार नाही.

डोकेदुखीवर घरगुती उपाय-

चांगली झोप गरजेची-

तज्ज्ञांच्या मते एखाद्यावेळी गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यानेही डोकेदुखी होऊ शकते. तर दुरीकडे कमी किंवा खूप कमी झोपेमुळेदेखील डोकेदुखीचा त्रास होतो. सांगायचे झाले तर झोपेच्या कमतरतेमुळे शरीराला आवश्यक असलेली पूर्ण विश्रांती मिळत नाही. स्लीप रिसर्च सोसायटीच्या मते, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने ७ ते ८ तासांची चांगली झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे घरात राहून डोकेदुखी होऊ लागली तर सर्व कामे सोडून स्वतःला आराम द्या आणि काही तास झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.

पाणी प्या-

शरीरात पाण्याची कमतरता अर्थातच डिहायड्रेशन आणि ॲसिडिटीमुळेही डोकेदुखी होऊ शकते. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते, डिहायड्रेशनचा लोकांच्या विचार करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना डोकेदुखी होऊ शकते. डोके दुखत असेल तर आधी १ ग्लास पाणी प्या. याशिवाय फळे, ज्यूस किंवा कोणत्याही प्रकारचे सूप सेवन केल्याने पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि काही वेळातच डोकेदुखी कमी होते.

केस सैल सोडा-

बऱ्याचदा काही दबावामुळेदेखील डोकेदुखी होऊ शकते. डोक्यावर दबाव आणणारा घटक ओळखा आणि तो लगेचच काढून टाका. खासकरून स्त्रियांच्या बाबतीत हे घडते. पोनीटेल, बन, टोपी, हेडबँड या सर्व गोष्टीमुळे केसांवर आणि डोक्यावर दबाव येतो. डोकेदुखी झाल्यास या गोष्टी लगेचच डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोकेदुखी थांबू शकते.

डोकेदुखीसाठी शेक-

बहुतांश वेळा स्नायू ताणले गेल्याने किंवा प्रभावित झाल्यास डोकेदुखी देखील होते. स्नायूंना उबदार गरम शेक दिल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. यासाठी हॉट बॅग मानेजवळ ठेवता येते. असे केल्यानेसुद्धा तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )