Gulkand Health Benefits: तुम्हालाही गोड पान खायला आवडतं का? या पानात गोडव्यासाठी काय वापरलं जातं हे तुम्हाला माहित आहे का? पानात गोडव्यासाठी गुलकंदाचा वापर केला जातो. गुलकंदचा शाब्दिक अर्थ आहे- गुल म्हणजे गुलाब आणि कंद म्हणजे गोड. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर याला सुपरफूड मानतात. पोटाच्या समस्येवर गुलकंद चांगलं मानलं जातं. गुलकंद देशी गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून बनवला जातो. काही लोक याला गुलाबाचा जाम म्हणून देखील ओळखतात. मेंदूचा थकवा आणि तणाव दूर करण्याच्या दृष्टीनेही गुलकंद खूप चांगला मानला जातो. याचा प्रभाव थंड असतो आणि त्याच्या सेवनाने मेंदूच्या मज्जातंतूंना आराम मिळतो. गुलकंद हा केवळ पानापुरता मर्यादित नसून, अनेक भारतीय पदार्थांची चव वाढविण्यासाठीही याचा वापर केला जातो.
देशी गुलाबाच्या २५० ग्रॅम ताज्या पाकळ्या घ्या. त्या पाण्याने नीट धुवून कापडावर वाळवा. पंख्यासमोर एका कापडावर थोडा वेळ पसरवा म्हणजे सर्व पाकळ्या कोरड्या होतील. ५०० ग्रॅम साखर घेऊन, त्याची पावडर तयार करा. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये घाला. तसेच, एक चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा बडीशेप पावडरही यात घाला. हे मिश्रण काचेच्या भांड्यात भरून १०-१२ दिवस उन्हात ठेवा म्हणजे साखर वितळून गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये चांगली मिसळेल. यानंतर उत्तम गुलकंद तयार होईल.
१) गुलकंदामध्ये थोडी काजू पावडर आणि बदाम वगैरे मिसळून जामप्रमाणे ब्रेडवर लावू शकता. याशिवाय गुलकंदामध्ये नारळ पावडर मिसळून मुलांसाठी गोड कुरकुरीत पराठे बनवू शकता. लहान मुले आणि मोठे सर्व जण उत्साहाने खातील.
२) थंड खीरीमध्ये गुलकंद थोड्या दुधात बारीक करून त्यात मिसळा. यामुळे खीरीची चव तर वाढेलच. पण सुगंधही अप्रतिम येईल.
३) काजू मखाना रोल बनवताना गुलकंद मध्यभागी स्टफ्ड करू शकता. छान दिसेल आणि चवही चांगली येईल.
४) मिल्कशेक, लस्सी किंवा सरबत बनवताना त्यात थोडे गुलकंद घातल्यास चव चांगली लागते.
५) थंड पाण्यात थोडे गुलकंद, थोडा लिंबाचा रस, मध आणि जिरे मिसळून प्यावे. दमट आणि उष्ण हवामानात आरोग्य चांगले राहील.
६) थंड दूध किंवा दह्यात थोडे गुलाबसरबत आणि गुलकंद घाला आणि नंतर मिठाईप्रमाणे एका बाऊलमध्ये ठेवून वर शेंगदाण्याचा कुट घालून सर्व्ह करा.
७) नारळाचे लाडू बनवताना लाडूच्या मधोमध गुलकंद आणि शेंगदाणे भरून घ्यावेत. लाडूची चव आणि पोषण दोन्ही वाढेल.
गुलकंद बाजारातून विकत घेतलेला असो किंवा घरी बनवलेला असो, त्याचे शेल्फ लाईफ दीर्घकाळ असते. फक्त लक्षात घ्या की, बरणीतून गुलकंद काढताना कोरडा चमचा वापरा. एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा, तर हा गुलकंद सहा महिने सहज वापरता येतो.
> आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट औषधांपैकी एक अशी गुलकंदाची ओळख आहे. गुलकंदाचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाच्या आजारांमध्ये आराम मिळतो. बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ते एक चमचा गुलकंद हलक्या कोमट पाण्यात किंवा दुधासोबत नियमित खा.
> उन्हाळ्यात अनेकदा काही लोकांना नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या असते. गुलकंदच्या सेवनाने या समस्येमध्ये आराम मिळतो.
> तोंडात उष्णता आली असल्यास गुलकंद खाणे फायदेशीर ठरते. यामुळे पित्त कमी होते आणि जळजळ थांबते.
> रात्री झोपताना गुलकंद दूध प्यायल्याने चांगली झोप येते. कारण यामुळे मन शांत होते. यामुळे तणाव आणि थकवाही दूर होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या