Govinda Safety Tips: दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांनी सुरक्षेसाठी वापरावे हेल्मेट, तज्ज्ञांचा सल्ला-govinda participating in dahi handi festival should use helmet for safety expert advice ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Govinda Safety Tips: दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांनी सुरक्षेसाठी वापरावे हेल्मेट, तज्ज्ञांचा सल्ला

Govinda Safety Tips: दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांनी सुरक्षेसाठी वापरावे हेल्मेट, तज्ज्ञांचा सल्ला

Aug 23, 2024 11:12 PM IST

Dahi Handi Festival 2024: कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात गोविंदांनी आपल्या सुरक्षेसाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

govinda safety tips - दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी टिप्स
govinda safety tips - दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी टिप्स (HT)

Safety Tips for Govinda Participating in Dahi Handi: जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी गोविंदा पथकाचा उत्साह शिगेला पोहचत असतो. दहीहंडीच्या वेळी मानवी थर रचताना अनेक अपघात होतात. अशावेळी डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, गुडघा तसेच कोपरावर पॅड, मनगटावर संरक्षणात्मक बँड वापरणे, त्याचबरोबर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करणे हे दुखापतींचा धोका कमी करण्यास मदत करते. योग्य खबरदारी न घेतल्यास गंभीर दुखापतींमुळे अंथरुणास खिळून रहावे लागू शकते अथवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. तर कधी गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू देखील ओढावू शकतो.

संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी, असंख्य गोविंदा आणि सहभागींना फ्रॅक्चर आणि मेंदूच्या दुखापतींचा सामना करावा लागतो. २०२३ मध्ये, मुंबईत दहीहंडी उत्सवाशी संबंधित २०० हून अधिक जखमी आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे. स्पर्धेच्या चढाओढीत सततच्या दबावामुळे सहभागी गोविंदाना अनावश्यक धोका पत्करावा लागतो.

गोविंदांनी अशी घ्यावी काळजी

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आलोक पांडे म्हणाले की, दहीहंडीच्या सणाच्या उत्साहात ऑर्थोपेडिक दुखापती विशेषत: गोविंदांना फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे तयार करणे आणि हंडी फोडण्यासाठी सहजतेने उंचच्या उच थर रचले जातात. यामुळे फ्रॅक्चर, पायास गंभीर दुखापत, खांद्याचे सांधे निखळणे किंवा ओटीपोटासंबंधीत फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि टेंडिनाइटिस आणि तसेच किरकोळ दुखापत आणि अथवा ताण येऊ शकतो. अपघातामुळे मनगट, घोटा, कोपर, नितंब, गुडघा आणि हात यांना दीर्घकालीन दुखापत होण्याचा धोका असतो. हंडी फोडण्याचा प्रयत्न करताना अनेकदा गोविंदाच्या मनगटावर अतिरिक्त ताण येतो. गोविंदांनी सेफ्टी गियर वापरणे आणि वॉर्मअप करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. घटनास्थळी वैद्यकीय पथक उपस्थित असल्यास गोविंदांना त्वरीत वैद्यकिय उपचार मिळतील.

लिलावती रूग्णालयात न्यूरोलॉजिस्ट डॉ. गिरीश सोनी सांगतात की, दहीहंडी उत्सवादरम्यान थर रचताना पडल्याने गोविंदांच्या मेंदूला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. मानवी मनोरे तयार करण्याचा प्रयत्न करताना उंचावरून खाली पडणे आणि धातूचे खांब किंवा कठीण पृष्ठभाग यासारख्या जड वस्तूंवर आदळल्याने मेंदूस गंभीचा धोका होऊ शकतो. या अचानक झालेल्या आघात किंवा तुमच्या डोक्याला झालेल्या दुखापतींमुळे कमकुवतपणा, समन्वय साधण्यात अडचणी येणे, अशक्तपणा, अर्धांगवायू, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), मेंदूचे विकार, अपस्मार, मायग्रेन, रक्ताच्या गुठळ्या, मज्जातंतूंचे नुकसान अशा गुंतागुंत होऊ शकतात. या गंभीर गुंतागुंत त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात.

या अपघातामुळे खाणे, चालणे किंवा शौचालय वापरणे यासारखी मूलभूत कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून रहावे लागते. हे जोखमीचे घटक कमी करण्यासाठी गोविंदांना सणासुदीच्या वातावरणाचा आनंद घेताना त्यांच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. डोक्यावर हेल्मेट किंवा गुडघ्याच्या संरक्षणासाठी पॅड घालणे, पुरेशी विश्रांती घेणे, नियमितपणे स्ट्रेचिंग करणे, योग्य तंत्रांचा सराव करणे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)