Konkan festival- मुंबईत आजपासून ‘ग्लोबल कोकण महोत्सव’; कोकणची खाद्य संस्कृती, उद्योगांचा मेळावा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Konkan festival- मुंबईत आजपासून ‘ग्लोबल कोकण महोत्सव’; कोकणची खाद्य संस्कृती, उद्योगांचा मेळावा

Konkan festival- मुंबईत आजपासून ‘ग्लोबल कोकण महोत्सव’; कोकणची खाद्य संस्कृती, उद्योगांचा मेळावा

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 06, 2025 10:17 AM IST

Global Konkan Festival - मुंबईत आजपासून ग्लोबल कोकण महोत्सवाला सुरूवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात येणार आहे. मुंबईत गोरेगावच्या नेस्को ग्राउंड येथे ६ ते ९ मार्चदरम्यान हा भव्य सोहळा रंगणार आहे.

मुंबईत आजपासून ‘ग्लोबल कोकण महोत्सव’
मुंबईत आजपासून ‘ग्लोबल कोकण महोत्सव’

मुंबईत आजपासून ग्लोबल कोकण महोत्सवाला सुरूवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात येणार आहे. मुंबईत गोरेगावच्या नेस्को ग्राउंड येथे ६ ते ९ मार्चदरम्यान हा भव्य सोहळा रंगणार आहे. कोकणचा विकास म्हणजे फक्त मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर येथील संस्कृती, माणसं आणि निसर्ग जपत पुढे जाण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कोकण भूमी प्रतिष्ठानने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असतील तर अध्यक्षपदी उद्योग मंत्री उदय सामंत असतील. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, वनमंत्री गणेश नाईक आणि खाण मंत्री शंभुराज देसाई उपस्थित असणार आहे.

यंदा ग्लोबल कोकणचे ११वे वर्ष आहे. या निमित्ताने कोकणवासीयांसाठी माहितीपूर्ण सत्रं, उद्योजकांसाठी मार्गदर्शन आणि नव्या संधींची माहिती देण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना, गुंतवणुकीच्या संधी, कोकणात स्टार्टअप्ससाठी नवे प्लॅटफॉर्म, कृषी आणि पर्यटन उद्योगातील नव्या कल्पना, शासकीय सवलती आणि सहकार्य याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव म्हणाले, 'यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ‘कोकण बिझनेस कॉन्क्लेव्ह’ हा आहे. या चार दिवसांमध्ये एक भव्य मार्गदर्शन सेमिनार सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात शेती, पर्यटन, मासेमारी, प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि शासकीय योजनांवरील तज्ज्ञ मंडळी प्रत्यक्ष येऊन कोकणवासीयांना वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय कोकणातील तरुणांना आणि उद्योजकांना नव्या संधी शोधण्यास मदत होण्यासाठी छोटे-छोटे वर्कशॉप्स आयोजित करण्यात येणार आहेत.

दररोज संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत कोकणच्या रंगारंग लोकसंस्कृतीचा सोहळा रंगणार आहे. कोकणातील दशावतार नाट्यप्रयोग, नमन सादरीकरण, आदिवासी तारपा नृत्य, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, गौरी नाच, कोकणी कवी संमेलन – शब्दांमधून कोकणाचा आवाज! ‘लाभले आम्हास भाग्य’ – कौशल इनामदार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ८ मार्चला मराठी हिप-हॉपचे सादरीकरण होणार आहे.

कोकणचा चवदार स्वाद घेण्यासाठी विशेष फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यात मालवणी, आगरी, संगमेश्वरी, वाडवळ, सीकेपी, ब्राह्मणी अशा विविध खाद्यसंस्कृतींचे खास पदार्थ चाखायला मिळणार आहेत.

Whats_app_banner