How much ghee to eat in a day: तूप हा भारतीय स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारा पदार्थ आहे. लहानांपासून-वयोवृद्धांपर्यंत सर्वजणच आवडीने तूप खातात. तुपाने आपल्या तोंडाला चव तर येतेच, शिवाय आरोग्यालाही विविध फायदे मिळतात. तज्ज्ञांच्या मते, तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. म्हणूनच आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ नेहमीच तूप खाण्याचा सल्ला देतात. आहारात तुपाचा समावेश करावा असेही सांगितले जाते. तुपात भरपूर पोषकतत्वे असतात. तुपातील पोषकतत्वे तुम्हाला इतर कशातही सापडणार नाहीत. परंतु जास्त प्रमाणात तूप खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही सहन करावे लागतात. त्यामुळे दिवसातून नेमके किती तूप खाणे योग्य असते? आणितूप खाण्याचे फायदे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असतात तसे नुकसानसुद्धा असतात. तुपाचेसुद्धा असेच आहे. तूप तुम्ही जोपर्यंत योग्य प्रमाणात खाता. तोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तूप खाता तेव्हा मात्र त्याचे दुष्परिणाम दिसतात. तज्ज्ञांच्या मते, ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा त्रास नाही त्यांनी रोज जवळपास ६ ते ८ चमचे तूप खावे. तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तूप खाण्यात काहीच नुकसान नाही. जर एखादी व्यक्ती व्यायाम करत नसेल, चालत-फिरत नसेल तर जास्त तूप खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच ज्यांना फॅटी ऍसिड आहे त्यांनी तूप खाऊ नये. जर एखाद्याला हृदय, पोट, फुफ्फुसांशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तूप खाणे योग्य आहे.
आयुर्वेद शास्त्रानुसार, पचनासाठी तूप उत्तम मानले जाते. कारण ते पचनसंस्थेला तेलकट करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. तूप खाल्ल्याने आतड्यामध्ये निरोगी बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. हे बॅक्टेरिया पचनास मदत करतात आणि त्यामुळे शरीरातील पोषक घटक मिळतात. यासोबतच मळमळ, पोटात मुरडा येणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठीदेखील तूप उपयुक्त आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते तूप म्हणजे A, D, E आणि K2 यासह अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वांचा खजिना आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करते, व्हिटॅमिन ई पेशींना फ्री रेडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते आणि व्हिटॅमिन K2 निरोगी हाडे आणि दातांसाठी तुमच्या शरीरात आवश्यक असलेले कॅल्शियम पोहोचवण्यास मदत करते.
तुपाच्या सेवनाने तुमची चयापचय क्रिया वाढते. आणि शरीरातील खराब चरबी निघून जाते. कारण तुपात फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते जे शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते आणि शरीराला त्वरित ऊर्जा पुरविण्याचे काम करते. तसेच वजन कमी करण्यासही तुपाची मदत होते.त्यासोबतच तुपामुळे स्मरणशक्ती वाढते आणि तुमचा मेंदू अधिक सक्रिय बनतो.
तुपात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, जस्त आणि लोह असते जे कोणत्याही ऋतूमध्ये निरोगी हाडे, त्वचा आणि केस राखण्यास मदत करते. तुपातील हे गुणधर्म ॲनिमियासारख्या आजारांपासूनही तुमचे रक्षण करतात. त्यामुळे ऋतू कोणताही असो, रोज तूप खावे.