देशभरात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले आहे. हा १० दिवसांचा उत्सव भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष उत्सव मानला जातो. शिवाय बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरी प्रतिष्ठापनेलाच काही ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन किंवा गौरी आवाहन असे संबोधले जाते.
आज घरोघरी गौरीचे आगमन होणार आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. शिवाय गौराईला सुंदर प्रकारे सजवण्यासाठी स्त्रियांची लगबग सुरु आहे. गौरीला सुंदर साडी नेसवून, विविध दागिने घालून, केसांचा अंबाडा घालून साज केला जातो. मात्र काही स्त्रियांना गौरीला साडी नेसवणे थोडे कठीण जाते. त्यामुळेच आज आपण सोप्या पद्धतीने गौरीला साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत.
आज गौरी आवाहन आहे. स्त्रिया घरोघरी गौरीच्या आगमनाची तयारी करत आहेत. गौरींना साज शृंगार करण्यासाठी स्त्रिया उत्सुक आहेत. मात्र इतर गोष्टींपेक्षा साडी नेसवणे काही जणांना फारच कठीण जाते. तासभर घालवूनसुद्धा मनासारखी साडी नेसवता येत नाही. त्यामुळेच आज आपण अशा काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्याचा मदतीने तुम्ही अगदी काही मिनिटांत गौरींना साडी नेसवून तयार कराल.
गौरींसाठी तुमच्याकडे घरी कोठ्या असतील तर, साडीचे टोक घेऊन त्याच्या दुसऱ्या भागापर्यंत म्हणजेच पदरापर्यंत निऱ्या करून घ्या. आता केलेल्या निऱ्या घेऊन त्या गौरींच्या अगदी समोरच्या बाजूला कोठीमध्ये खोचून घ्या. महत्वाचं म्हणजे जर कोठीलाच धड जोडलेले असेल तर गौरींच्या पोटाजवळ येणाऱ्या भागावर एक दोरी बांधून घ्या. आता त्या दोरीमध्ये निऱ्या खोचून घ्या. हे सर्वकाही अगदी हलक्या हाताने करावे लागेल. नंतर डाव्या बाजूने निरीचे एक टोक अगदी हलक्या हाताने ओढून मागे घ्या.
त्यांनंतर येते पदरला पिन करायची स्टेप, गौरींना साडी नेसवताना महत्वाची गोष्ट म्हणजे निऱ्या आणि पदर नेहमी लहान करावा. आता पिन पदर करताना, गौरींच्या मागून डाव्या बाजूने पदर घेऊन तो समोरच्या बाजूला अलगद पिन करा. पदर पिन करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, पदर करताना सर्वच भागाला पिन लावू नका. पदराच्या आतील काही भाग रिकामा ठेवा. याचं कारण म्हणजे गौरींचा मुखवटा बसवल्यानंतर तुम्हाला देवीच्या डोक्यावर पदर सहजपणे घेता येईल. यांनतर समोर केलेल्या निऱ्या हळुवारपणे एकसारख्या करून त्याला पिन लावा. अशाप्रकारे काही मिनिटांत गौरींना साडी नेसवून साज करता येईल.