Wheat Flour Modak Recipe: गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला असून बाप्पाला घरी आणण्याची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. तुमच्या घरी सुद्धा बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असाल तर नैवेद्याला विविध प्रकारचे मोदक अर्पण करू शकता. जर तुम्हाला मोदक कसे बनवायचे हे माहित नसेल किंवा पारंपारिक मोदक बनवायला वेळ नसेल तर गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या मोदकाची ही सोपी रेसिपी तुमची मदत करेल. हे मोदक क्षणार्धात तयार होतील. यासाठी मोदकाचे साचे नक्की खरेदी करा. जेणेकरून त्यांना आकार देणे सोपे जाईल. चला तर मग जाणून घ्या झटपट तयार होणाऱ्या गव्हाच्या पीठाच्या मोदकची रेसिपी
- एक कप गव्हाचे पीठ
- अर्धा कप देशी तूप
- बारीक किसलेले काजू
- बारीक किसलेले बदाम
- बारीक किसलेले पिस्ता
- एक चमचा वेलची पूड
- अर्धा कप गूळ
हे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका जाड भांड्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ घाला. आता हे पीठ मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि त्याला चांगला वास येऊ लागेल. पीठ चांगले भाजले की त्यात थोडे जास्त तूप घालून मंद आचेवर परतून घ्यावे. आता त्यात बारीक किसलेले ड्राय फ्रूट्स घालावे. पिस्ता, काजू आणि बदाम याची बारीक पावडर करू नका आणि ते थोडे जाडसर असू द्या. हे सर्व ड्राय फ्रूट्स पिठात घालून परतून घ्यावेत. भाजल्याने ड्राय फ्रूट्समधून तेलही निघेल आणि पीठ खूप मऊ दिसू लागेल. आता गूळ घालून चांगले मिक्स करावे. गॅस बंद करून वेलची पूड घाला. आता कढई गॅसवरून खाली काढून हाताने स्पर्श करता येईल एवढे थंड करा.
आता हे मिश्रण मोदक साच्यात टाकून झटपट मोदक तयार करा. गव्हाच्या पिठाचे मिश्रण थंड होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर मोदक बनणे अवघड होऊन मिश्रण फुटू लागेल. हाताने मिश्रण उचलता येत नसेल तर चमच्याच्या साहाय्याने साच्यात भरून मोदक तयार करावे. तुमचे गव्हाच्या पीठाचे मोदक अर्पण करायला तयार आहेत.