Ganesh Chaturthi Recipe: गणरायाच्या आगमनाला बनवा चणा डाळीचे मोदक, बाप्पा होतील प्रसन्न
Modak Recipe: लाडक्या बाप्पाचे सर्वत्र मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. बाप्पाच्या स्वागताला तुम्ही त्यांच्या आवडीचे मोदक बनवणार असाल तर चणा डाळीच्या मोदकाची ही रेसिपी ट्राय करा.
Chana Dal Modak Recipe: गणेश चतुर्थी हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज म्हणजे १९ सप्टेंबरपासून १० दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार. अनेक घरी दहा दिवसांचा गपणती असतो. तर काही लोक दीड दिवसाचा किंवा ५ दिवसाचा उत्सव साजरा करतात. या दिवसात बाप्पाच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो. तुम्ही सुद्धा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पासाठी मोदक बनवणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही गणरायाला प्रसन्न करण्यासाठी चणा डाळीचे मोदक बनू शकता. कसे बनवायचे ते जाणून घ्या.
ट्रेंडिंग न्यूज
चणा डाळीचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...
- चणा डाळ
- नारळ किसलेले
- तांदळाचे पीठ
- मीठ
- उकळते पाणी
- तिळाचे तेल
- गूळ
- वेलची पावडर
- तूप
- पाणी
कसे बनवावे
चणा डाळीचे मोदक बनवण्यासाठी चणा डाळ धुवून घ्या आणि त्यात पाणी टाकून प्रेशर कुकरमध्ये ठेवा. साधारण ४ शिट्ट्या घ्या आणि नंतर मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा. गॅस बंद करा आणि कुकर थंड झाल्यावर उघडा. आता एका पॅनमध्ये गूळ आणि पाणी घेऊन ते वितळेपर्यंत गरम करा. आता ते गाळून बाजूला ठेवा. परत त्याच पॅनमध्ये ठेवा. आता त्यात किसलेला नारळ, शिजलेली चणा डाळ घालून मिक्स करा. ते घट्ट होईपर्यंत शिजवत रहा आणि त्यात वेलची पूड, तूप घालून मिक्स करा. एका बाउलमध्ये काढून थंड होऊ द्या.
आता पीठ मळून घ्या. यासाठी एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तेल घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. आता १५ मिनिटे थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर त्यात १ चमचा तेल घालून मऊ पीठ मळून घ्या. आता मोदकाचा साचा घ्या आणि त्यावर थोडं तूप लावा. आता मळलेल्या पीठाचा थोडासा भाग घ्या आणि साच्यात समान रीतीने पसरवा. त्यात तयार केलेले चणा डाळीचे सारण ठेवून नीट झाकून घ्या. साचा उघडा आणि मोदक प्लेटमध्ये ठेवा. आता अशा पद्धतीने सर्व मोदक तयार झाल्यावर ते स्टीमरमध्ये ठेवून ८ ते १० मिनिटे वाफवून घ्या. तुमचे मोदक तयार आहेत.