Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचं अनोखं मंदिर, पत्र लिहून लावला जातो कौल, मंदिर कुठे आहे आणि कसं पोहचाल?-ganesh chaturthi 2024 where is sawai madhopur trinetra ganesha temple and how to reach it ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचं अनोखं मंदिर, पत्र लिहून लावला जातो कौल, मंदिर कुठे आहे आणि कसं पोहचाल?

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचं अनोखं मंदिर, पत्र लिहून लावला जातो कौल, मंदिर कुठे आहे आणि कसं पोहचाल?

Sep 08, 2024 09:04 AM IST

Trinetra Ganesh temple of Ranthambore: देशभरात असलेल्या गणपतीच्या अनेक मंदिरांना सुंदर सजावट करण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे सवाई माधोपूरचे त्रिनेत्र गणेश मंदिर होय. हे मंदिर देशभरातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

त्रिनेत्र गणेश मंदिर
त्रिनेत्र गणेश मंदिर (Shutterstock )

Sawai Madhopur Trinetra Ganesha Temple:  गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पुढील दहा दिवस हा उत्सव चालणार आहे. त्यामुळेच या खास उत्सवाला देशभरात असलेल्या गणपतीच्या अनेक मंदिरांना सुंदर सजावट करण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे सवाई माधोपूरचे त्रिनेत्र गणेश मंदिर होय. हे मंदिर देशभरातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर रणथंभौर किल्ल्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. 

येथील गणपती बाप्पाला भारताचा प्रथम गणेश देवता म्हटलं जातं. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक भक्त बाप्पाच्या विविध मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेत आहेत. तुम्हाला जर बाप्पाचं अनोखं मंदिर पाहायचं असेल तर तुम्ही माधोपूरचे त्रिनेत्र गणेश मंदिर पाहू शकता. चला तर मग, या प्रसिद्ध मंदिरात कसे पोहोचायचे आणि या मंदिराचे वैशिष्टय काय ते जाणून घ्या.

भक्तांची पत्रे-

त्रिनेत्र गणेश मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणारी पत्रे. खऱ्या मनाने मागितलेली प्रत्येक इच्छा या मंदिरात पूर्ण होते, असे म्हटले जाते. त्यामुळे येथील प्रत्येक शुभकार्यापूर्वी भाविक त्रिनेत्र गणेशाला निमंत्रणपत्र पाठवतात. त्याचबरोबर लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे अर्जही करतात. प्रत्येकाची इच्छापत्रे आणि निमंत्रणे मंदिरात पोहोचतात. त्यानंतर त्याला गणपती बाप्पाच्या चरणी ठेवले जाते.

दिवसभरात होतात पाच आरती-

जगभरातील लोक या मंदिरात श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी येतात. या प्रसिद्ध मंदिरात दररोज प्रामुख्याने पाच आरती होतात. ज्यामध्ये सकाळची आरती, त्यानंतर श्रृंगार आरती, भोग आरती, सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळची आरती आणि शयन आरती होते. अशाप्रकारे दिवसभरात येणाऱ्या जवळपास सर्वच भक्तांना बाप्पाच्या आरतीचा लाभ घेता येतो.

याठिकाणी कसे पोहचाल?

१) हवाई मार्गे : जयपूरचे सांगनेर विमानतळ हे त्रिनेत्र गणेश मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून वैयक्तिक टॅक्सी किंवा कार भाड्याने घेऊन विमानतळावरून त्रिनेत्र गणेश मंदिरात सहज पोहोचता येते. हे मंदिर विमानतळापासून १८० किमी अंतरावर आहे.

२) रोडवेज- येथे सरकारी बसेसची चांगली सोय आहे. जयपूर, दिल्ली, अहमदाबाद, जोधपूर आणि अजमेर येथून तुम्हाला मंदिरात पोहोचण्यासाठी सहज बस मिळतील.

३) रेल्वे मार्ग - त्रिनेत्र गणेश मंदिरात जाण्यासाठी सवाई माधोपूर हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. स्टेशनवरून तुम्ही कोणतीही टॅक्सी सहज भाड्याने घेऊ शकता.

Whats_app_banner