Easy recipe of Ukadi Modak: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. घराच्या सजावटीपासून ते बाप्पाच्या नैवेद्यापर्यंत सर्वच गोष्टीची लगबग सुरु आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आवडते पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. बाप्पाला चविष्ट मोदक खूप आवडतात. हा एक असा सण आहे जो भक्ती आणि स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी घेऊन येतो. पारंपारिकपणे, मोदक तळलेले किंवा उकडीचे असतात.ज्या लोकांना तेल टाळायचा आहे त्यांच्यासाठी उकडीचे मोदक हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु अद्याप अनेक स्त्रियांना उकडीचे मोदक जमतच नाहीत. परंतु टेन्शन घेऊ नका यंदाच्या गणेश चतुर्थीला आम्ही सांगितलेल्या सोप्या रेसिपीप्रमाणे मोदक बनवा नक्कीच तुम्हाला चांगले जमतील.
-तांदळाचे पीठ- १ कप
- पाणी-१ कप
-तूप- १ टीस्पून
-मीठ- एक चिमूटभर
१ कप किसलेले नारळ
१/२ कप गूळ
१/२ टीस्पून वेलची पावडर
एक चिमूटभर जायफळ पावडर
ड्रायफ्रूट्स (आवडीनुसार)
सारण तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत किसलेले खोबरे आणि गूळ घालून ते मंद आचेवर शिजवा. जोपर्यंत गूळ वितळून नारळात मिसळत नाही तोपर्यंत सतत ढवळत राहा. नंतर त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर, चिरलेला काजू आणि मनुका घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत २ ते ३ मिनिटे शिजवा. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. अशाप्रकारे सारण तयार आहे.
मोदकाचे वरील आवरण तयार करताना, सर्वप्रथम तांदळाच्या पिठात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तूप घाला. आता पीठ चांगले मळून घ्या. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नका. त्यानंतर पीठ ओल्या कापडाने झाकून ५ ते १० मिनिटे तसेच ठेवा.
तळहातावर थोडे तूप किंवा पाणी लावा पिठाचा थोडासा भाग घ्या आणि त्याला गुळगुळीत पेढ्याचा आकार द्या. पिठाचा गोळा हाताने सपाट करा आणि एक लहान चकती बनवा आणि मध्यभागी आपण आधीच तयार केलेले सारण भरा. आता हलक्या हाताने त्या पिठाच्या आवरणाच्या कडा धरून मध्यभागी एकत्र करा. अशाप्रकारे तुमच्या मोदकाला सुंदर सुबक आकार द्या. आता गॅसवर स्टीमचे भांडे ठेऊन १० ते १५ मिनिटे हे सर्व मोदक वाफवून घ्या. आणि थंड झाल्यावर बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा.