Peanut Modak Recipe: गणपती बाप्पाला मोदक सर्वात प्रिय असल्याचे मानले जाते. यावर्षी ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने गणरायाला प्रसन्न करण्यासाठी घराच्या सजावटीपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवण्याची तयारी जोरात सुरू आहे. या गणेश चतुर्थीला तुम्हाला काही खास बनवायचं असेल तर शेंगदाण्याचे मोदक बनवू शकता. हे बनवणे खूप सोपे आहे आणि झटपट तयार होते. गणेश चतुर्थीला बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण करण्यासाठी हे टेस्टी शेंगदाण्याचे मोदक बनवायचे असेल तर ही रेसिपी फॉलो करा.
- २ कप कच्चे शेंगदाणे
- अर्धा कप पावडर गूळ किंवा किसलेला गूळ
- २ टेबलस्पून वितळवलेले तूप
हे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम जाड तळाचा पॅन किंवा कढई गरम करून त्यात कच्चे शेंगदाणे घालावे. नंतर शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. शेंगदाणे जळणार नाहीत म्हणून ते सतत ढवळत राहा. तुम्हाला हवं असेल तर मध्येच गॅस कमी करून भाजून घ्या. नंतर भाजलेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढा आणि थंड होऊ द्या. जेव्हा शेंगदाणे खोलीच्या तापमानावर येतात तेव्हा त्यांचे साल काढून टाकण्यासाठी शेंगदाणे आपल्या तळहातांमध्ये चोळा. शेंगदाण्याचे साल सहज काढल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून ते जाडसर बारीक करून घ्या. आता शेंगदाण्यात गूळ आणि तूप घाला. जर तुम्हाला थोडे जाडसर टेक्सचर आवडत असेल तर बारीक केलेले शेंगदाणे एका ताटात काढा आणि नंतर त्यात गूळ आणि तूप घाला. पण गुळगुळीत टेक्सचर आवडत असेल तर तूप आणि गूळ घालून शेंगदाणे पुन्हा बारीक करून घ्या. आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर मळून घ्या जेणेकरून सर्व काही चांगले मिक्स होईल.
आता मोदक बनवण्यासाठी मोदकाच्या साच्याला तुपाचे काही थेंब लावून ग्रीस करा. नंतर शेंगदाण्याचे तयार केलेल्या मिश्रणाचा एक भाग घेऊन साच्यात घाला. ते चांगले दाबा आणि कडांच्या खालच्या बाजूने जास्तीचा भाग काढून टाका. साचा उघडा आणि मोदक बाहेर काढा.