Motichoor Ladoo Recipe: देशभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यावर्षी हा उत्सव ७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की, गणपतीच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास ते काम सुरळीत पूर्ण होते. हेच कारण आहे की घरात कोणतेही शुभ कार्य सुरू होण्यापूर्वी लोक गणपतीला पहिले आमंत्रण नक्की देतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या लाडक्या बाप्पाला त्याचे आवडते पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करतात. गणपती बाप्पाला मोदकांप्रमाणेच मोतीचूरचे लाडू देखील खूप प्रिय असतात. तुम्हाला सुद्धा मोतीचूरच्या लाडूचा प्रसाद अर्पण करायचा असेल तर ही रेसिपी तुमची मदत करेल. या सोप्या रेसिपीने तुम्ही घरी मोतीचूरचे लाडू बनवू शकता.
- २ कप बेसन
- ३ कप साखर
- १ लिटर दूध
- ६ कप तूप
- १ टीस्पून हिरवी वेलची
- १/२ टीस्पून फूड कलर
- १ चिमूटभर बेकिंग सोडा
- ४ कप पाणी
मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करा. यासाठी मध्यम आचेवर एका मोठ्या कढईत पाणी गरम करा. यानंतर त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे पाण्यात विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहा. पाण्यात दूध घालून ५ मिनिटे मंद आचेवर चांगले उकळू द्यावे. उकळताना पाकात फेस तयार होऊ लागल्यास चमच्याच्या साहाय्याने काढून पाक एकसारखे घट्ट होईपर्यंत शिजवावे याची विशेष काळजी घ्या. यानंतर पाकात वेलची पूड आणि केशरी रंगाचा फूड कलर घालून हळूहळू ढवळत राहा आणि नंतर बाजूला ठेवा. आता एका मोठ्या भांड्यात बेसन आणि दूध मऊ होईपर्यंत मिक्स करा. यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करा.
आता एका खोल कढईत तूप गरम करा. कढईच्या अगदी वर झारा ठेवा आणि लाडूसाठी तयार केलेले बॅटर तेलात घाला. बुंदी तेलात सोनेरी आणि मऊ होईपर्यंत शिजवा. आता तयार केलेली बुंदी टिश्यू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून त्यातून अतिरिक्त तेल निघून जाईल. आता साखरेच्या पाकात तयार केलेली बुंदी घालून नीट मिक्स करून थंड होण्यासाठी राहू द्या. आता या बुंदीपासून लहान मध्यम आकाराचे लाडू तयार करा.