मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pomegranate Juice: वेट लॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेतो डाळिंबाचा ज्यूस, हे आहेत फायदे

Pomegranate Juice: वेट लॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेतो डाळिंबाचा ज्यूस, हे आहेत फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 19, 2024 04:42 PM IST

Pomegranate Juice Benefits: केवळ शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस उपयुक्त असल्याचे अनेक लोकांना वाटते. पण असे नाहीये. डाळिंबातील अनेक पोषक घटक वजन कमी करणे, हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

डाळिंबाचा ज्यूस पिण्याचे फायदे
डाळिंबाचा ज्यूस पिण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Pomegranate Juice: जर तुम्हाला तुमचे वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक टिकवून ठेवायची असेल तर रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायला सुरुवात करा. अनेक लोकांना असे वाटते की डाळिंबाचा रस केवळ शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतो. पण डाळिंबात असलेले प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे अनेक पोषक घटक व्यक्तीला अनेक आरोग्यदायी फायदे देतात. फक्त आरोग्यच नाही तर आपले सौंदर्य राखण्यासाठी देखील डाळिंबाचा रस फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया डाळिंबाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.

डाळिंबाचा रस प्यायल्याने मिळतात हे फायदे (benefits of drinking pomegranate juice)

मजबूत पचनसंस्था

दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने व्यक्तीची पचनक्रिया मजबूत होते. डाळिंबाचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि सूज, बद्धकोष्ठता, गॅस, ब्लोटिंग इत्यादी पचन संबंधी समस्या दूर होतात. डाळिंबात असलेली संयुगे आतड्यांकरिता चांगल्या जीवाणूंना प्रोत्साहन देऊन पचनसंस्थेतील जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकतात.

एनिमियापासून आराम

नियमितपणे डाळिंबाचा रस प्यायल्याने एनिमियाची समस्या दूर होऊ शकते. डाळिंबाच्या रसामध्ये असलेले लोह शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते

डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आरोग्यविषयक परिस्थितींचा वाढता धोका टाळता येतो. डाळिंबातील पोषक घटक रक्तदाब नियंत्रित करून हृदयाच्या धमन्यांची सूज कमी करू शकतात.

ग्लोइंग स्किन

प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. परंतु डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन केल्याने त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत होते आणि अतिनील किरणांपासून संरक्षण होते.

वेट लॉससाठी फायदेशीर

डाळिंबाचे ज्यूस नियमित सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते. डाळिंबात असलेले पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक चयापचय वाढवून चरबी जाळण्यास मदत करतात. यामुळे तुमची भूक कमी होते आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. हे वजन कमी करण्यास मदत करते.

डाळिंबाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ

डाळिंबाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ ही दिवसा आहे. अशा वेळी डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. तर रात्री डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमची झोप खराब होऊ शकते. याशिवाय डाळिंबात असलेली नैसर्गिक साखर दिवसा सहज पचते, तर रात्री पचणे कठीण असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel