Health Benefits of Pink Guava: हिवाळा सुरू होताच पेरू खायला सर्वांना आवडते. बाजारात सर्वत्र हिरवे आणि पिवळे पेरू पहायला मिळतात. पेरू आतून सुद्धा दोन रंगाचे असतात हे तुम्हाला माहीत आहे का? पांढरा आणि गुलाबी असे दोन रंगाचे पेरू असतात. पांढऱ्या पेरूप्रमाणेच गुलाबी पेरू सुद्धा खाण्यास अतिशय चविष्ट असतात. शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. गुलाबी पेरूमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, फायबर आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात. ज्याचा फायदा व्यक्तीला मधुमेहापासून ते वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो. विविध पोषक तत्त्वांची समृद्ध गुलाबी पेरू खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात ते जाणून घ्या.
गुलाबी पेरूचे नियमित सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. गुलाबी पेरूमध्ये असलेल्या फायबरच्या मुबलक प्रमाणामुळे रक्तातील एलडीएलची पातळी कमी होऊ शकते. ज्यांना शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे त्यांनी नियमितपणे याचे सेवन करावे.
गुलाबी पेरूमध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. याशिवाय याच्या सेवनाने त्वचेचे आरोग्यही सुधारते. काही संशोधनात असे दिसून आले आहे की १०० ग्रॅम पेरूमधून शरीराला सुमारे २२८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळू शकते.
गुलाबी पेरू नियमित खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फायबर मिळू शकते. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
गुलाबी पेरू मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर म्हटले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गुलाबी पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहाची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच गुलाबी पेरू हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम फळ मानले जाते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स २४ पेक्षा कमी आहे. याशिवाय यामध्ये असलेले उच्च फायबर पचनसंस्था देखील निरोगी ठेवते.
गुलाबी पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करून हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)