Heart Health: पावसाळ्यात हायड्रेशन आणि हृदयाच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heart Health: पावसाळ्यात हायड्रेशन आणि हृदयाच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष

Heart Health: पावसाळ्यात हायड्रेशन आणि हृदयाच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष

Published Jul 31, 2024 08:59 PM IST

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतुमध्ये हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.

हृदयाच्या आरोग्यासाठी टिप्स
हृदयाच्या आरोग्यासाठी टिप्स (unsplash)

Tips for Hydration and Heart Health During Monsoon: पावसाळ्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळत असला तरी नव्या समस्या उद्भवतात. विशेषतः हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी या समस्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असते. हायड्रेशनची काळजी घेणे म्हणजे केवळ तहान भागवणे नव्हे तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी ते आवश्यक असते. हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी पावसाळ्यातील हायड्रेशनचे महत्त्व आणि त्यांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत बोरसे म्हणाले, "हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी हायड्रेशन ही मूलभूत गरज असते. कारण हृदयविकारमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखले जाते आणि हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. पावसाळ्यात तापमानाचा पारा खाली आल्यामुळे तहान लागण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी असलेली जोखीम वाढते. म्हणून हायड्रेशनच्या पातळीवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

दिवसाला आठ ग्लास पाणी पिणे हे एक सर्वसामान्य प्रमाण आहे. पण वय, वजन, ॲक्टिव्हिटींचा स्तर, आरोग्याची स्थिती या विविध घटकांनुसार यात बदल होऊ शकतो. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी औषधे (ज्यांचा फ्लुइड बॅलेन्स म्हणजेच शरीरातील द्रवाच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो) आणि डॉक्टरांनी द्रवपदार्थांच्या सेवनावर घातलेली बंधने यांचा विचार केला गेला पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार पाण्याचे प्रमाण निश्चित केले जाऊ शकते.

पावसाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी टिप्स

नियमित लक्ष ठेवणे

आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पाणी प्यायले जात आहे की नाही, याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यावर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी ॲप्स किंवा जर्नल्सचा उपयोग होऊ शकतो.

संतुलित इलेक्ट्रोलाइट्स

वातावरणात आर्द्रता जास्त असेल घाम जास्त आल्याने इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण असंतुलित होते. अशा वेळी, वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ले तर इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी मदत होते.

माफक प्रमाणात कॅफिनचे सेवन

कॉफी आणि चहाचा डायटुरेटिक परिणाम होतो. परिणामी, शरीरातून जास्त प्रमाणात द्रव निघून जाते. कॅफिनचे सेवन मर्यादित ठेवणे आणि कॅफिनरहीत पर्याय किंवा हर्बल चहाचे सेवन केल्यास हायड्रेशनसाठी मदत होते.

पाणी जास्त असलेले पदार्थ समाविष्ट करणे

कलिंगड, संत्री यासारखी फळे किंवा काकडीसारख्या फळभाज्यांमध्ये पाणी जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाणी व हायड्रेशनची पातळी वाढण्यास मदत होते.

औषधे वेळवर घेणे

काही औषधांमुळे हायड्रेशनच्या पातळीवर किंवा इलेक्ट्रोलाइटच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि दिलेली औषधे वेळेवर घ्या.

डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे लक्ष ठेवा

- डिहायड्रेशनमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याच्या लक्षणांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे

- तोंड आणि ओठ कोरडे होणे

- मूत्राचा रंग गडद होणे

- भोवळ येणे किंवा डोके गरगरणे

- थकवा किंवा गोंधळ होणे

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner