Tips to Manage Asthma in Monsoon: सांधेदुखी आणि त्वचेच्या समस्यांप्रमाणेच पावसाळ्यात श्वसनाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. पावसाळा सुरु झाल्यावर ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्यांचे विकार दिसून येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे देखील दम्याच्या रुग्णांना दम्याचा अधिक त्रास जाणवू शकतो.
हवामानातील अचानक झालेल्या बदलांमुळे दम्याचा त्रास वाढु शकतो. दम लागणे, खोकला आणि छातीत घरघर यांसारखी लक्षणे जाणवतात. आर्द्रतेचे प्रमाण वाढते प्रमाण, परागकण, डस्ट माइट्स, बुरशी आणि घरातील एलर्जीन यासारखे अनेक घटक दम्यास कारणीभूत ठरु शकतात. काही टिप्स फॉलो करून दम्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मुंबई येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. तन्वी भट्ट यांनी काही उपयुक्त टिप्स सांगितले आहेत.
- दम्याचा त्रास टाळण्यासाठी जोरदार पाऊस सुरु असताना विनाकारण बाहेर न पडता घरातच राहावे. खिडक्या आणि दार बंद ठेवा. घरात बुरशी, धूळ आणि पाळीव प्राण्यांचा कोंडा टाळा. दम्याचा त्रास टाळण्यासाठी मास्क आणि स्कार्फचा पर्याय निवडा. ओलावा टाळण्यासाठी खोल्या, स्वयंपाकघर आणि बाथरुम कोरडे ठेवा.
- घरात हवा खेळती राहिल, पुरेसा सूर्यप्रकाश येईल हे सुनिश्चित करा. घरातील एसी स्वच्छ करा. घरात ह्युमिडिफायर वापरा, जेणेकरुन तुम्हाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.
- बाथरुम आणि वॉशरूम सारखी ओलसर ठिकाणे वेळोवेळी जंतुनाशकांनी स्वच्छ करा. धूळ घालवण्यासाठी बेडशीट, कार्पेट आणि उशाचे कव्हर कोमट पाण्याने धुवा आणि नीट वाळवा.
- जर तुम्हाला घराबाहेर पडायचे असेल तर चेहरा झाकण्यासाठी मास्क किंवा स्कार्फ वापरा.
- घरामध्ये पाळीव प्राणी नाहीत याची खात्री करा. कारण ते देखील दम्यास कारणीभूत ठरु शकतात.
- घर स्वच्छ आणि धूळ विरहीत ठेवा. ज्या भागात परागकणांची संख्या जास्त आहे आणि हवेची गुणवत्ता खराब आहे अशा भागात जाऊ नका. कारण हे घटक तुमच्या फुफ्फुसांना घातक ठरु शकतात. एलर्जीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी घरी परतल्यावर लगेल कपडे बदला.
- घरी धूम्रपान टाळा किंवा जे धूम्रपान करतात त्यांच्या आसपास राहणे टाळा.
- डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या आणि इनहेलर हातात ठेवा. अल्कोहोलचे सेवन टाळा आणि जंक फुड, मसालेदार पदार्थ, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. नियमित आरोग्य तपासणी करा व गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- घरच्या घरी व्यायाम करा. योगा, जिमिंग किंवा चालणे यासारख्या व्यायाम प्रकाराची निवड करा. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा.
- संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फ्लू आणि न्यूमोनिया लसीकरण करुन घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)