Habits for Healthy Heart: आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी बहुतेक जण तणावाखाली जगत असतात. थोडा फार तणाव असणे सामान्य आहे, पण अति प्रमाणात किंवा सतत तणाव असेल तर त्याचा आरोग्यावर, विशेषतः हृदयावर परिणाम होतो. GOQii इंडिया फिट रिपोर्ट २२-२३ च्या स्ट्रेस अँड मेंटल हेल्थ अभ्यासानुसार तब्बल २४% भारतीय कामाशी संबंधित परिस्थिती आणि आर्थिक अस्थैर्यामुळे येणाऱ्या तणावाशी झुंजत आहेत. असे असले तरी तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदय निरोगी राखण्यासाठी आपण निश्चितच काही उपाय करू शकतो.
तणाव हा आयुष्याचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा. पण तणावाचे तुमच्या आयुष्यावर नियंत्रण आहे किंवा तुमच्या हृदयाच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण होतो आहे, असे होता कामा नये. तुमच्या दिनचर्येत काही गोष्टी करून तुम्ही तणावाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकता आणि हृदयाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता, असे मुंबई येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे सीनियर इंटव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. तिलक सुवर्णा यांनी सांगितले. या व्यतिरिक्त तुमचा रक्तदाब, कोलेस्टरॉलची पातळी आणि हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तणाव हाताळल्याने आणि हृदयाच्या आरोग्याला पूरक असलेली जीवनशैली अंगिकारून तुम्ही हृदयविकाराची जोखील कमी करू शकता आणि अधिक आनंदी व समाधानी आयुष्य जगू शकता.
तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करा. तुम्हाला आनंद देणाऱ्या आणि रिलॅक्स करणाऱ्या ॲक्टिव्हिटी म्हणजेच योग, ध्यानधारणा करा किंवा निसर्गात फिरायला जा. स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य दिल्याने तणावाचे शारीरिक व मानसिक परिणाम कमी होण्यास मदत होते.
नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य राखण्याची ही गुरुकिल्ली आहे. व्यायाम केल्याने एंडॉर्फिन हार्मोन स्त्रवते. त्यामुळे आपला मूड नैसर्गिकपणे चांगला होतो. दर आठवड्याला चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यासारखा मध्यम तीव्रतेचा व्यायाम किमान १५० मिनिटे करावा.
तणाव व्यवस्थापन व हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलित आहाराची महत्त्वाची भूमिका असते. फळे, भाज्या, होल ग्रेन, लीन प्रोटिन आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असलेला आहार घ्यावा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, सोडियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळावे.
सजगता आणि रिलॅक्स होण्याचे तंत्र यामुळे तणाव कमी होण्यास व हृदयविकाराची जोखीम कमी होते. सजगतेने केलेले श्वासाचे व्यायम, प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन आणि ध्यानधारणा यामुळे आपण रिलॅक्स होतो आणि भावनात्मक पातळीवर शांत होतो. या उपायांमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, जी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
मित्रांना आणि नातेवाईकांना, आप्तेष्टांना भेटणे आवश्यक आहे. तणावाच्या काळात ते तुम्हाला भावनिक आधार देऊ शकतात. तुमचा ज्या व्यक्तींवर विश्वास आहे त्यांच्याशी तुमच्या भावना मोकळेपणे बोला. समस्या सांगितल्या की त्या बोलता बोलता त्यावर उपाय मिळतो आणि त्या समस्येकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही प्राप्त होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या