Benefits To Get Off Chair And Move: आपल्या सगळ्यांचं आयुष्य खूप धावपळीचे बनलेले आहे. ऑफिसमध्ये किंवा घरी सतत लॅपटॉपसमोर बसून राहणे हा आपल्या रुटीनचा भाग बनला आहे. पण हे दीर्घकाळात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण थोडीशी हालचाल करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा स्नायू मजबूत करण्यासाठी नसतो तर ते आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
एखादी हालचाल, मग ते योग असो, चालणे असो किंवा धावणे असो हे केल्याने त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो. व्यायाम करताना आपला हार्ट रेट वाढतो. शांत असताना आपल्या हृदयाची गती साधारण ६० ते १०० बीट्स प्रती मिनिट असते. पण व्यायाम करताना ते १५० ते १८० बीट्स प्रति मिनिट इतक्या वेगाने होते. यामुळे आपल्या शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो. अगदी काही मिनिटांच्या व्यायामानंतर आपल्या त्वचेला गुलाबी रंग येतो हे तुम्ही पाहिलं असेल? हे याच रक्तप्रवाहामुळे घडतं. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी एका जागी जास्त वेळ बसून राहू नका, उठा आहे हालचाल करा. जाणून घ्या याचे फायदे.
व्यायाम केल्याने आपल्या शरीराच्या पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन हे आपल्या पेशींचं अन्न आहे असं म्हणता येईल. म्हणूनच व्यायामामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ऑक्सिजनयुक्त होते आणि निरोगी राहते.
व्यायाम केल्याने आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. घाम येणं हे फक्त शरीराला थंड करण्याचे काम नसून ते विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम सुद्धा करते.
व्यायाम केल्याने आपली पचनशक्ती सुधारते. त्यामुळे आपण जे काही खातो ते चांगले पचते. मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड इत्यादी आजार होण्याचं एक कारण म्हणजे मंद पचनक्रिया असते. नियमित व्यायाम, हालचाल केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
व्यायाम फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. व्यायाम केल्याने आपल्या मेंदूत हॅपी हार्मोन्स निर्माण होतात आणि आपले मन चांगले राहते. म्हणून खुर्चीवर बसून राहू नका. उठून थोडी हालचाल करा आणि तुमच्या आरोग्याची आणि मनाची काळजी घ्या!
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या