Morning walk for weight loss: सध्या वजन वाढण्याची समस्या फारच सामान्य झाली आहे. १० पैकी ८ लोक या समस्येने त्रस्त आहेत. एखाद्याचे वजन वाढू लागले की, कुणीतरी तुम्हाला नक्कीच मॉर्निंग वॉक सुरू करण्याचा सल्ला देतो. हा सल्ला तसं पाहायला गेल्यास फारच चांगला आहे. कारण चालणे हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे. चालण्याने गुडघे मजबूत होतात, लवचिकता वाढते आणि वजनही नियंत्रित करता येते. पण जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला असेल किंवा दुखापत झाली असेल, तर मॉर्निंग वॉकला जाण्याआधी तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. चालण्याने तुम्हाला प्रचंड फायदे मिळू शकतात. पण चुकीच्या पद्धतीने चालल्याने तुमच्या गुडघ्यांना इजाही होऊ शकते. चालताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात केली असेल. तर तुमच्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे की, मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी स्ट्रेचिंग आणि वॉर्म-अप करणे खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीला तुम्ही अगदी सावकाश गतीने चालणे सुरू करा, जेणेकरून तुमचे स्नायू आणि सांधे गरम होऊ शकतील. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंची लवचिकता वाढते आणि गुडघ्यांवर दबाव कमी होतो. चालल्यानंतरही स्ट्रेचिंग करा जेणेकरून स्नायू थंड होतील आणि स्नायूंचा थकवा दूर होईल.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर चालत असाल, तर लक्षात ठेवा तुमच्या शूजची क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. हलके सोल्स आणि मऊ कुशनिंग असलेले शूज निवडा. जेणेकरून तुमच्या पायाला योग्य आधार मिळेल. योग्य शूज तुमच्या गुडघ्यांना धक्क्यांपासून वाचवतात आणि लांब अंतर चालल्यानंतरही तुमचे पाय आरामशीर ठेवतात. जर शूज तुम्हाला व्यवस्थित बसत नसतील किंवा आरामशीर आणि फिट नसतील तर पायावर फोड येण्याची दाट शक्यता असते.
वजन कमी करण्यासाठी जर तुम्हीही सकाळी फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल, आणि तुमचे गुडघे आधीच दुखत असतील. तर अशावेळी लगेच १० किलोमीटर चालणे सुरू करू नका. हळूहळू सुरुवात करा आणि नंतर अंतर वाढवत रहा. गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत आणि बळकट करण्यासाठी डोंगर आणि पायऱ्या चढणे फायदेशीर ठरू शकते.
जेव्हा तुमचे वजन वाढते तेव्हा, त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या गुडघ्यांवर होतो. वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग वॉकचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या आहारात बदल करून काही किलो वजन कमी करा. यामुळे तुमच्या शरीराला चालण्यासाठी तयार होण्यास मदत होईल. आणि तुमच्या गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडणार नाही. त्यामुळे तुम्ही फिरून सहजपणे वजन कमी करू शकाल.