Exercise rules in marathi: व्यायाम करणे हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे. याद्वारे तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता. तज्ज्ञांच्या मते, नियमित व्यायाम केल्याने फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक आरोग्यही सुधारते. अलीकडच्या काळात लोक मोठ्या संख्येने जिममध्ये जातात आणि तासनतास व्यायाम करतात. काही लोक कमी व्यायाम करतात, तर काही जास्त काळ व्यायाम करतात. परंतु प्रश्न असा आहे की, चांगल्या फिटनेससाठी आणि स्नायू तयार करण्यासाठी दररोज किती तास व्यायाम केला पाहिजे? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जिममध्ये प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळे टार्गेट असते. काही लोक त्यांचा फिटनेस सुधारण्यासाठी जिममध्ये येतात. तर अनेकांना मसल बनवायचे असतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिम जॉईन करतात. खासकरून जे ऍथलेटिक्स आहेत त्यांच्यासाठी नियमित वर्कआउटदेखील खूप महत्वाचे आहे. सांगायचे झाले तर, तुम्ही दिवसातून किती तास जिममध्ये व्यायाम करावा हे तुमचे फिटनेस टार्गेट, शारीरिक क्षमता आणि तुमची मानसिक तयारी यावर अवलंबून असते.
तज्ज्ञ सांगतात की, फिटनेस आहे तसा राखण्यासाठी आठवड्यातून किमान ३ ते ५ दिवस जवळपास अर्धा तास ते एक तास व्यायाम करणे पुरेसे आहे. यामध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकता वाढवण्यासाठी व्यायामाचा समावेश असू शकतो. परंतु जर तुमचे ध्येय वजन कमी करणे असेल तर आठवड्यातून ४ ते ६ दिवस ४५ ते ९० मिनिटे व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. त्यात कार्डिओ, हाय इंटेन्सिटी व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा समावेश असावा. स्नायूंच्या वाढीसाठी अर्थातच मसल गेन करण्यासाठी आठवड्यातून ३ ते ५ दिवस जवळपास ६० ते ९० मिनिटे व्यायाम करणे उत्तम समजले जाते. यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग आणि विश्रांतीसाठी ठराविक दिवस असावेत. जेणेकरून तुमची बॉडी रिलॅक्स होईल. आणि पुन्हा व्यायाम करण्यास तितकीच स्ट्रेंथ मिळेल.
तर दुसरीकडे फक्त लवचिकता आणि स्ट्रेचिंगसाठी, २० ते ३० मिनिटांचा व्यायाम पुरेसा आहे. हे दररोज केले जाऊ शकते किंवा तुमच्या व्यायामानंतर त्यात हे समाविष्ट केले जाऊ शकते. याशिवाय, ऍथलेटिक आपली खेळातील कामगिरी आणि क्रीडा प्रशिक्षण सुधारण्यासाठी, ९० पासून १२० मिनिटांपर्यंत व्यायाम करू शकतात. ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ खेळाशी समबंधित काही महत्वाचे व्यायामांचा समावेश असू शकतो.
परंतु इतर लोक करत आहेत म्हणून नव्हे तर तुमच्या क्षमतेनुसार कसरत करावी. कारण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. एकाच दिवशी शारीरिक गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने थकवा येऊ शकतो. किंवा शारीरिक इजा होऊ शकते. त्यामुळे शक्यतो असे करणे टाळा. शिवाय एकदा तुमच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला अवश्य घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमचे टार्गेट सेट करता येईल.