Benefits of eating fennel Seeds: भारतीय स्वयंपाकघरात मिळणारे मसाले भोजनाची चव तर वाढवतातच शिवाय औषधाचेदेखील काम करतात. असाच एक मसाला म्हणजे बडीशेप होय. बडीशेपचा वापर अनेक पारंपरिक पदार्थांपासून फॅन्सी पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच अनेक रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर मुखवास म्हणून बडीशेपही दिली जाते. एका विशिष्ट जातीची बडीशेप ही चव वाढवणाऱ्या गुणधर्मांचा खजिना आहे. फारच कमी लोकांना माहीत आहे की, बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट्ससोबतच शरीरातील जळजळ कमी करणारे आणि बॅक्टेरियांना मारणारे घटकदेखील असतात.
बडीशेपच्या बियांमध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु त्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात. आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या शरीराला अँटिऑक्सिडंट्सची गरज असते हे तुम्ही अनेकदा वाचले असेल. त्यात पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक अँटिऑक्सिडंट्स युक्त आहार घेतात त्यांना कर्करोग, हृदयरोग, न्यूरोलॉजिकल रोग, लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी असतो.
रोजच्या खानपानात असलेल्या बडीशेपमध्ये ऍनेथोल आढळते. ज्यामध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता असते. टेस्ट ट्यूब अभ्यासानुसार, बडिशेप स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करते आणि त्यांना शरीरात पसरण्यापासून प्रतिबंधितदेखील करते. त्यामुळे स्त्रियांना बडीशेप वरदान ठरते.
इतर घरगुती पदार्थाप्रमाणे, बडीशेपदेखील चरबीचा शत्रू मानली जाते. यामध्ये फायबर्स असतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. बरेच लोक बडीशेप चहा पितात किंवा चरबी कमी करण्यासाठी बडीशेप पाण्यामध्ये भिजवून ते पाणी पितात. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होऊन, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
प्राण्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, बडीशेपचा अर्क स्तन आणि यकृताच्या कर्करोगापासून संरक्षण करते. त्यामुळे नियमित बडीशेपचे सेवन फायदेशीर ठरते.
बडीशेपमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ते शरीरात बॅक्टेरिया आणि यीस्टच्या वाढीस प्रतिबंध करते.
बडीशेपचे पाणी मासिक पाळीच्या क्रॅम्पपासूनदेखील आराम देते. जर पाळीदरम्यान तुमच्या पोटात प्रचंड वेदना होत असतील, तर तुम्ही बडीशेपचे पाणी पिऊ शकता. याशिवाय हे पचन सुधारण्यासाठीही खाल्लं जातं.
(Disclaimer : कोणत्याही औषधाला पर्याय म्हणून बडीशेप देऊ नका. या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)