Family Vacation Trip Spots : कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता थंडीचा महिना सुरू झाला आहे. ऑक्टोबर हिटमुळे बेजार झालेल्या लोकांना आता थंडीमुळे काहीसा दिलासा मिळत आहे. देशभरातील अनेक भागांमध्ये आता गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. थंडी पडू लागली की, अनेक लोक आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करू लागतात. या काळात अनेकदा खूप सुट्ट्या लागून येतात. त्यामुळे प्रत्येकाची कौटुंबिक सहल याच काळात निघते. यंदाच्या थंडीत जर तुम्ही देखील आपल्या कुटुंबासोबत फिरायला जायचा विचार करत असाल, तर यावेळी भारताचा दाक्षिणात्य भाग उत्तम ऑप्शन ठरू शकतो. जर तुम्ही साऊथ इंडिया फिरण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता. दक्षिण भारतात अशी काही ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही याकाळात हिरवीगार शेतं आणि पर्वतांमध्ये फिरायला जाऊ शकता. या ठिकाणांचं वातावरण आणि नैसर्गिक दृश्य अतिशय मनमोहक आहे.
कर्नाटकातील कुर्ग हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. कुर्गमध्ये ‘ऍबी फॉल्स’ हा एक अतिशय सुंदर धबधबा आहे, जो चारही बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. इथला दुबारे एलिफंट कॅम्प हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्हाला हत्तीवर स्वार होण्याची संधीही मिळू शकते. इथलं ‘किंग्स सीट’ हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे तुम्हाला सुंदर नैसर्गिक दृश्ये पाहण्याची संधी मिळेल. येथून तुम्ही कुर्ग व्हॅलीचे चित्तथरारक दृश्य पाहू शकता. होन्नमना केरे तलाव हे कुर्गमधील सर्वात मोठे तलाव आहे. हा तलाव कॉफीचे मळे, डोंगर आणि गुहा यांनी वेढलेला आहे. या परिसरात पिकनिक, फोटोग्राफी, गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंगच्या संधी मिळू शकतात.
‘मंजुमेल बॉईज’ हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल, तर त्यात तुम्ही कोडाईकनालचे सौंदर्य नक्कीच पाहिले असेल. तामिळनाडूमधील कोडाईकनालला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबतही जाऊ शकता. विशेषत: जर तुम्हाला तुमची सुट्टी घालवण्यासाठी शांत ठिकाणी जायचे असेल, तर गर्दीपासून दूर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. बेअर शोला फॉल्स, कोडाई लेक, कुक्कल लेणी, थलायर फॉल्स, पिलर रॉक्स, वट्टाकनली, कोकर वॉक, डेव्हिल्स किचन, बेरीजम लेक, ब्रायंट पार्क, मोइर पॉइंट, सिल्व्हर कॅस्केड फॉल्स, पेरुमल पीक आणि पाइनची जंगले ही सुंदर ठिकाणे इथे आहेत.
केरळचे वायनाड हे देखील अतिशय सुंदर ठिकाण आहे. आपण येथे अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. बाणासूर सागर धरण, एडक्कल लेणी, चेंबरा शिखर, वायनाड वन्यजीव अभयारण्य, सोचीपारा धबधबा, मीनमुट्टी धबधबा, अरिप्परा धबधबा, इरुप्पू फॉल्स, पुकोडे तलाव, नीलिमाला व्ह्यू पॉइंट, पक्षीपाथलम पक्षी अभयारण्य, कर्पुझा धरणात तुम्हाला अनेक गोष्टी करण्याची संधी मिळू शकते. येथे तुम्ही थीम पार्क आणि कार्लाड लेक ही ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता.