Home Remedies: सोमवारी संपूर्ण देशात होळी मोठ्या प्रमाणत साजरी झाली. रंगाचा हा सण लोकांनी उत्साहात साजरा केला. पण होळीचा दिवशी काही लोक असे मजबूत रंग लावतात जे काढणे कठीण होते. अनेक वेळा साबणाने धुतल्यानंतर किंवा तेल लावल्यानंतरही हे रंग सहजासहजी उतरत नाहीत. चेहऱ्याला किंवा अंगाला जास्त चोळले किंवा साबण लावले तर त्वचा आणखी कोरडी होते. चेहऱ्याच्या स्किनला त्रास होऊ लागतो. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांच्या चेहऱ्यावर पुरळ उठतात किंवा त्यांची त्वचा लाल होऊ लागते. अशा परिस्थितीत ताबडतोब काही उपाय केल्यास आराम मिळू शकतो. रंग काढून टाकल्यानंतर त्वचेचा कोरडेपणा, लालसरपणा आणि मुरुम आले आहेत? अशावेळी हे उपाय करा. याने लवकर आराम मिळेल.
रासायनिक रंगांमुळे काही लोकांच्या त्वचेवर जळजळ होते. यासाठी दहीचा वापर करणे हा उत्तम पर्याय ठरेल. चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही दह्यात थोडे मध मिसळून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा थंड होईल आणि ती खूप मऊ होईल.
मुलतानी माती स्किन केअरमध्ये फार बेस्ट आहे. ज्या लोकांच्या त्वचेवर रंगांमुळे पिंपल्स आले आहे त्यांनी ही माती वापरावी. मुलतानी माती आणि गुलाबपाणीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा थंड होईल आणि पुरळ कमी होईल. मुलतानी माती लावल्याने त्वचेचा लालसरपणाही कमी होऊ लागतो.
रंग काढण्याच्या वेळी त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव झाली असेल, तर जास्त घासणे टाळा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, कोरफड जेल लावा. यामुळे कोरडेपणा कमी होईल आणि त्वचेवरील जळजळीपासून आराम मिळेल. कोरफड जेल लावल्याने त्वचा हायड्रेट होते आणि त्वचा बरी होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)