Eye Care tips : वाढत्या वयोमानानुसार मोतिबिंदूची समस्या उद्भवतो. डोळ्यातील लेन्समध्ये धुसरपणा आल्याने डोळ्यांवर पडणारा प्रकाश परिणामकारकतेने रेटिनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे दृष्टी धुसर होते किंवा अस्पष्ट दिसू लागते. शस्त्रक्रिया हा मोतिबिंदूसाठी उपलब्ध असलेला एकमेव उपचार आहे. डोळ्यांमधील लेन्समध्ये फ्री रॅडिकल्सचे (ऑक्सिडेटिव्ह इजा करणारे अस्थिर रेणू) प्रमाण जास्त झाल्याने मोतिबिंदू तयार होतो.
नेत्ररोगतज्ञ आणि मोतिबिंदू शस्त्रक्रियाकर्ता डॉ. अश्विनी घुगे यांनी माहिती देताना सांगितले की, या जीवनसत्वांचे नियमित सेवन केल्याने मोतिबिंदू तयार होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो.
ई जीवनसत्व हे एक अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे. काही अभ्यासांनुसार, ई जीवनसत्व मोतिबिंदू आणि वयोमानानुसार होणाऱ्या मॅक्युलर डीजेनेरेशनचा (डोळ्याच्या मधोमध असलेल्या मॅक्युला कमकुवत होणे) धोका कमी करू शकते. बदाम, ब्रोकोली, कीवी, आंबा, पालक आणि टोमॅटोमध्ये ई जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते.
फ्री रॅडिकल्सला निष्प्रभ करून, सी जीवनसत्व डोळ्याच्या लेन्सला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून (शरीरातील मुक्त रॅडिकल्स (अस्थिर रेणू) आणि अँटिऑक्सिडंट्स यांच्यातील असंतुलन) संरक्षित करण्यास मदत करते. या शिवाय, क जीवनसत्व डोळ्यातील इतर अँटिऑक्सिडंट्सच्या पुनर्निर्मितीत योगदान देते, ज्यामुळे लेन्सची संरक्षणक्षमता आणखी वाढते. संत्रे, लिंबू आणि आवळा यांसारख्या आंबट फळांमध्ये सी जीवनसत्व आढळते.
अ जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अश्रुपटलाची गुणवत्ता सुधारते, रेटिनाचा ऱ्हास होण्यास प्रतिबंध करते आणि मोतिबिंदू तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते. हिरव्या पालेभाज्या, गाजर, आंबा, बकरीचे यकृत, भोपळी मिरची आणि भोपळा या अन्नपदार्थांमध्ये अ जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते.
ल्यूटिन आणि झिएक्सँथिन हे कॅरोटिनॉइड्स आहेत, जे वनस्पतींमध्ये तयार होतात. ते मोतिबिंदू, डोळे कोरडे होणे, आणि मॅक्युलर डीजेनेरेशन (डोळ्याच्या मधोमध असलेला मॅक्युला कमकुवत होणे) यांसारख्या डोळ्यांच्या अनेक समस्यांना प्रतिबंध करतात. ब्रोकोली, अंड्याचा पिवळा बलक, केल, कीवी, कोथिंबीर, आणि लाल भोपळी मिरची यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये ल्यूटिन आणि झिएक्सँथिन मुबलक प्रमाणात असतात.
संतुलित आहार किंवा सप्लिमेंट्सच्या माध्यमातून बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वाचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास तुम्ही डोळ्यांचे एकूण आरोग्य टिकवू शकता आणि मोतिबिंदू होण्याचा धोका कमी करू शकता. हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, बिया, मांस, दुग्धजन्य पदार्थ, होल ग्रेन, कडधान्ये इत्यादीमध्ये बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते.
तुम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही वयोमानपरत्वे मोतिबिंदू तयार होणे अपरिहार्य असते. या सुपरफुड्समुळे मोतिबिंदू तयार होण्याच्या व वाढण्याच्या प्रक्रियेचा वेग थोडा कमी होऊ शकतो. पण, या पदार्थांमुळे मोतिबिंदूला पूर्ण प्रतिबंध करता येत नाही.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)