Cervical Cancer: प्रत्येकाला माहीत असावे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी या महत्त्वाच्या गोष्टी, पाहा सुरक्षित कसे राहावे-everyone should know these important facts about cervical cancer know how to stay safe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cervical Cancer: प्रत्येकाला माहीत असावे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी या महत्त्वाच्या गोष्टी, पाहा सुरक्षित कसे राहावे

Cervical Cancer: प्रत्येकाला माहीत असावे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी या महत्त्वाच्या गोष्टी, पाहा सुरक्षित कसे राहावे

Oct 01, 2024 09:16 PM IST

Health Care Tips: गर्भाशय मुखाचा कर्करोग याविषयी अनेक गोष्टी महिलांना माहीत नसतात. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यापासून सुरक्षित कसे राहावे याविषयी जाणून घ्या.

गर्भाशय मुखाचा कर्करोग
गर्भाशय मुखाचा कर्करोग (unsplash)

Important Facts About Cervical Cancer: भारतात महिलांना वैयक्तिक आरोग्य समस्यांविषयी चर्चा करताना अनेकदा समाजातील रूढी, संकेत आणि टॅबूमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. प्रजनन आरोग्याविषयी बोलण्याची ही संकोच भावना गंभीर आजार, जसे की गर्भाशय मुखाचा कर्करोग, यांचे वेळेवर निदान होण्यापासून रोखते. भारतात दररोज २०० महिलांचे गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे प्राण जातात. हा भारतातील महिलांना होणारा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. विशेष म्हणजे, हा कर्करोग टाळता, ओळखता आणि योग्य वेळी निदान केल्यास उपचार करता येतो. त्यामुळे या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करणे जीवन वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. WHO / FOGSI कॉल्पोस्कोपी कोर्स प्रशिक्षक वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, कॉल्पोस्कोपिस्ट, प्रतिबंधक ओन्कोलॉजिस्ट डॉ. प्रिया गणेशकुमार यांनी या कर्करोगाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

हे आहे कारण

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण उच्च जोखमीचे मानव पॅपिलोमाव्हायरस (HPV) प्रकार आहेत, जे जवळपास ९९.७% प्रकरणांमध्ये आढळतात. एचव्हीपी हा सामान्य व्हायरस असून, बहुतांश लोकांच्या शरीरात तो एकदा तरी येतो, परंतु रोगप्रतिकारक प्रणाली त्याचा नाश करते. त्यामुळे, एचव्हीपी असणे म्हणजे कर्करोग होईल असे नाही. मात्र, जर हा व्हायरस दीर्घकाळ राहिला तर तो गर्भाशयाच्या पेशींमध्ये बदल करू शकतो, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. यासाठी नियमित तपासणी आणि जनजागृती आवश्यक आहे.

दिसतात ही लक्षणं

गर्भाशय मुखाचा कर्करोग सुरुवातीला कोणतेही लक्षणे दाखवत नाही. परंतु काही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामध्ये लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव, वेदनादायक संबंध, ओटीपोट दुखणे, अचानक वजन कमी होणे, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव इत्यादी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

काही महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते, जसे की रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या महिला, एचआयव्ही असलेल्या महिला किंवा लहान वयात आई बनलेल्या महिला. धूम्रपान करणे, अनेक लैंगिक जोडीदार असणे हे देखील जोखमीचे घटक आहेत. तसेच, फक्त एकाच जोडीदार असणे म्हणजे एचव्हीपी होणार नाही असे नाही.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय

नियमित तपासणी करा, लस घ्या, आणि जननेंद्रियांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. ९-१४ वर्षांच्या मुलींना दोन मात्रांमध्ये एचव्हीपी लस दिली जाते. याशिवाय २५व्या वर्षापासून पॅप स्मिअर तपासणी दर तीन वर्षांनी करणे आवश्यक आहे आणि ३० वर्षानंतर दर पाच वर्षांनी एचव्हीपी तपासणी करणे सर्वात योग्य आहे. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लस आणि नियमित तपासणी एकत्रितपणे आवश्यक आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner