Akshay Kumar Fitness Tips: हेल्दी लाइफस्टाइल जगण्याचा विचार केला तर यामध्ये बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचे नाव सर्वात वर येते. वयाची पन्नाशी ओलांडूनही अक्षय एखाद्या नवख्या अभिनेत्यासारखा फिट आणि उत्साही दिसून येतो. अक्षय एक अभिनेता असूनसुद्धा स्वतः एक शिस्तबद्ध आयुष्य जगत आहे. फिट राहण्यासाठी अक्षयने स्वतःसाठी अनेक नियम बनवले आहेत. पण पाहायला गेलं तर आता तेच नियम अक्षयची हेल्दी लाइफस्टाइल बनले आहेत. कोणत्याही वयात तुम्हालाही अक्षयप्रमाणे फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर त्याच्या लाइफस्टाइलमधील काही गोष्टी फॉलो करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. आज आपण अक्षय कुमारच्या अशाच काही हेल्दी सवयी जाणून घेणार आहोत.
अक्षयच्या मते, फिटनेस हे त्याच्यासाठी तात्पुरते ध्येय नाहीय. फिटनेस ही त्याची लाइफस्टाइल आहे. दिवसेंदिवस फिट राहणे हेच त्याचे ध्येय आहे. त्यामुळे या गोष्टीकडे फक्त एक तात्पुरते ध्येय म्हणून न बघता, तुम्ही तुमच्या आयुष्याचा भाग बनवणे गरजेचे आहे. अभिनेत्याच्या मते तुम्ही एखाद्या दिवशी किंवा उत्सवांमध्ये थोडेसे आळशी बनून आराम करू शकता. परंतु त्यांनंतर पुन्हा तुम्ही तुमच्या हेल्दी लाइफस्टाइलकडे वळणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही तुमचा फिटनेस राखू शकता. त्यामुळे अक्षय शिस्तबद्धता हाच फिटनेसचा पाया असल्याचे सांगतो.
अक्षय कुमार त्याच्या फिटनेससोबत त्याच्या झोपेच्या नियनमांबाबतही ओळखला जातो. कारण अक्षय कुमार झोपेच्या वेळेबाबत फारच स्ट्रिक्ट आहे. अभिनेता अगदी ९ वाजता झोपी जातो. आणि सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच जवळपास ५. ३० ला उठतो. त्याच्या मते झोपेसाठी ही वेळ योग्य आहे. याकाळात आपल्या शरीराला सर्व गोष्टींमधून रिपेअर होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा दिवसभर ताजेतवाने वाटून एक नवी ऊर्जा मिळते.
अक्षय कुमारच्या मते, तुम्ही काहीही खा पण ते फक्त नैसर्गिक असले पाहिजे. अर्थातच फास्टफूड किंवा प्रक्रिया केलेले अन्न दूर ठेवावे. आपल्या शरीराला आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सर्व घटक आपल्या अन्नाद्वारे आपल्या शरीरात जाणे आवश्यक असल्याचे तो म्हणतो. त्यामुळेच या सर्व गोष्टीचा समावेश असलेला समतोल आहार आपण घेतला पाहिजे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ५७ वर्षांचा आहे. परंतु आजही तो एखाद्या नवख्या अभिनेत्याप्रमाणे सक्रिय आहे. अक्षय अतिशय फिट आहे. विशेष म्हणजे सेटवर अनेक खतरनाक स्टंट तो कोणत्याही बॉडी डबलशिवाय स्वतः करणे पसंत करतो. त्यामुळेच अक्षयकडे बघून वय हा फक्त एक आकडाच असल्याचे लक्षात येते. कारण तुम्ही हेल्दी लाइफस्टाइलने कोणत्याही वयात फिट आणि ऍक्टिव्ह राहू शकता.
अक्षय कुमारच्या मते फिटनेस म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नाही तर फिटनेस म्हणजे मानसिक आरोग्य जपणेसुद्धा आहे. शारीरिक आरोग्य जपताना आपल्या मानसिक आरोग्यावरसुद्धा पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळेच अक्षय स्वतःला निसर्गाशी कनेक्ट करून मानसिक आरोग्य जपतो. अभिनेता मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही मिनिट मेडिटेशनसोबत बाहेर चालायला जाणेसुद्धा उत्तम पर्याय समजतो.