मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kaas Pathar: स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर कास पठारावर ई-बस दाखल; आता आरामात होणार सौंदर्य सफर
Kaas Pathar in Satara District
Kaas Pathar in Satara District

Kaas Pathar: स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर कास पठारावर ई-बस दाखल; आता आरामात होणार सौंदर्य सफर

22 September 2022, 21:08 ISTHT Marathi Desk

सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. (Four electric buses launched at Kaas Pathar in Satara district)

सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. राज्याच्या पर्यटन खात्याकडून कास पठारावर आज चार इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. कास पठारावर पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच ‘वॉक वे’ (Walk way) तसेच ‘दर्शन गॅलरी’ (Viewing Gallery) सुरू करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत मंत्रालयातून राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. कास पठाराच्या संवर्धनासाठी येथे स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करून सुरक्षा वाढविली जाईल तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत कार्यवाही करण्यात येईल असे लोढा यांनी यावेळी सांगितले. कास पठारावर वन्य प्राण्यांचा वावर वाढून हे पठार नैसर्गिकरित्या अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर राज्य सरकार भर देत असून नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे त्यात कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल, असेही लोढा म्हणाले.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदुषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई-बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या ई-बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळकडून उपलब्ध झालेल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षी ई-बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. या बसेस कासनी गावापासून कास पठारापर्यंत अर्धा कि.मी. पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणास आळा बसण्यास मदत होईल.

याप्रसंगी पर्यटन खात्याचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर व सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निसर्गरम्य कास पठार

सातारा शहरापासून २५ किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगामध्ये निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर जवळपास १० चौरस किमी परिसरात दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रंगांचा बहर पाहायला मिळतो. ८५० वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पहायला मिळतात. त्यामुळे विविध प्रकारचे फुलपाखरु देखील येथे बागडतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुलांच्या रोपांचे चक्र वाढत असल्याने पठार दर १५-२० दिवसांनी रंग बदलते. वनस्पती शास्त्रासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती कास पठारावर आढळतात. तसेच अनेक स्थानिक व लुप्त होत चाललेल्या वनस्पती सुद्धा इथे आढळल्या आहेत. कास पठार हे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरणार आहे. गेल्या ४-५ वर्षात हे पठार पर्यटकांना आकर्षित करत आहे. कास पठाराला हंगामात दररोज तीन हजार पेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात. युनिस्कोने कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.