Home Remedies to Get Rid of Black Knees: प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराची प्रचंड काळजी असते. शरीर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके दिसावे यासाठी सर्वजण विशेष काळजी घेत असतात. शरीराची निगा राखण्यासाठी विविध उपायही करत असतात. मात्र बहुतांश वेळा इतकी काळजी घेऊनसुद्धा शरीराचे काही भाग जास्तच काळे पडतात. जसे की, गुडघे, कोपर आणि मान होय. विशेषत: मान आणि गुडघ्यासारख्या भागात बहुतेकदा हायपरपिग्मेंटेशनमुळे त्वचा काळी होते. ही स्थिती मेलेनिनच्या अत्यधिक उत्पादनामुळे उद्भवते आणि ॲकॅन्थोसिस निग्रिकन्सशी निगडित असते. ज्यामध्ये त्वचा जाड आणि काळी होते. काळ्या त्वचेला कारणीभूत असलेल्या इतर घटकांमध्ये सूर्यप्रकाश, कोरडी त्वचा आणि अपुरा एक्सफोलिएशन यांचा समावेश होतो. या भागात तयार होणारे डाग कालांतराने त्वचा निस्तेज करू शकतात.
बरेच लोक गुडघे, मान आणि कोपर यांचा काळेपणा घालवण्यासाठी विविध महागडे प्रॉडक्टस वापरतात. परंतु त्यांना याचा काहीच उपयोग होत नाही. अशावेळी केमिकलयुक्त प्रॉडक्टसचा त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यतादेखील असते. त्यामुळेच अनेक लोक घरगुती उपाय शोधत असतात. तुम्हीसुद्धा तुमचे गुडघे, कोपर आणि मानेचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशी एक घरगुती पेस्ट पाहणार आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्हाला सुंदर आणि नितळ त्वचा मिळू शकते.
-बेकिंग सोडा- २ चमचे
-टूथपेस्ट- २ चमचे
-खोबरेल तेल- ३ ते ४ थेंब
-दूध- २ चमचे
-अर्धा टोमॅटो
-मीठ- २ चमचे
एका वाटीमध्ये २ चमचे बेकिंग सोडा घाला. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनो वापरू शकता. आता वाटीत २ चमचे कोलगेट टूथपेस्ट किंवा पावडर घाला. त्यात १ चमचे मीठ आणि २ ते ३ चमचे दूध घाला. मिश्रण चांगले एकत्र होईपर्यंत ढवळा. शेवटी, पेस्टमध्ये ३ ते ४ थेंब खोबरेल तेल घाला आणि चांगले एकजीव करून घ्या. आता ही घरगुती पेस्ट तयार आहे.
आता तयार पेस्ट घेऊन मान, गुडघे, कोपर अशा काळ्या पडलेल्या भागांवर लावून घ्या. जवळपास १५ मिनिटे पेस्ट ठेऊन ती सुकू द्या. चांगल्या फायद्यांसाठी टोमॅटो वापरा. यासाठी पेस्ट सुकल्यानंतर टोमॅटो अर्धा कापून घ्या आणि टोमॅटोची कापलेली बाजू पेस्ट लावलेल्या भागांवर चोळून घ्या. यामुळे काळेपणा कमी होण्यास चांगली मदत होईल.
ही पेस्ट मान, कोपर, गुडघे आणि अगदी अंडरआर्म्सवरदेखील सहजपणे लावू शकता.तुमच्या त्वचेला ही पेस्ट सहन होईल किंवा कोणती ऍलर्जी होणार नाही नाहे निश्चित करण्यासाठी वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करून पाहा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)