मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Epilepsy in Kids: लहान मुलांमधील एपिलेप्सीचे वेळीच निदान आणि उपचार होणे आवश्यक, टाळता येते भविष्यातील गुंतागुंत

Epilepsy in Kids: लहान मुलांमधील एपिलेप्सीचे वेळीच निदान आणि उपचार होणे आवश्यक, टाळता येते भविष्यातील गुंतागुंत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 16, 2024 11:04 PM IST

Kids Health Tips: लहान मुलांमधील एपिलेप्सीविषयी महिती असणं गरजेचं आहे. त्याचे वेळीच निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. जाणून घ्या सविस्तर.

मुलांमधील एपिलेप्सीचे निदान आणि उपचार
मुलांमधील एपिलेप्सीचे निदान आणि उपचार

Epilepsy in Kids: लहान मुलांमधील अपस्मार किंवा एपिलेप्सी हे पालकांसाठी चिंताजनक बाब ठरते आणि त्याचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास भविष्याच अनेक गुंतागुंत निर्माण करते. मुलांमधील एपिलेप्सीचे विविध प्रकार समजून घेणे, आपल्या मुलांना त्यानुसार योग्य वैद्यकिय उपचार पुरविणे आवश्यक आहे. पालकांनी मुलाला कोणत्या विशिष्ट प्रकारच्या एपिलेप्सीचा त्रास होत आहे याचे अचूक निदान करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बालपणातील एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. याचा मुलाच्या विकासावर, त्याच्या शारीरीक कार्यावर आणि एकुण जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

बऱ्याच एपिलेप्सीची प्रकरणे ही वाढत्या वयानुसार गंभीर होतात तर काहींना प्रौढावस्थेतही झटके येतात. बालपणातील एपिलेप्सीच्या व्यवस्थापनामध्ये औषधे आणि जीवनशैलीतील बदल यांचा समावेश असतो. निदान झाल्यावर प्रत्येक मुलासाठी त्यानुसार उपचार योजना आखणे, योग्य औषधांचा डोस निश्चित करणे, सर्व बाबींचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याची आवश्यकता भासू शकते. औषधोपचार परिणामकारक नसलेल्या प्रकरणांमध्ये, काही मुलांवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका ताटेर म्हणाल्या. लीलावती हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ खारकर सांगतात, जेव्हा मुलाला चक्कर येते तेव्हा पालक घाबरून जाऊ शकतात. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे झटके समजून न येणे आणि मुलाच्या भविष्याची चिंता वाटणे हे आहेत. साधारणपणे आपल्या मेंदूचा एक भाग लहान विद्युत प्रवाहाची वापर करुन दुसऱ्याशी संवाद साधतो.

अपस्माराचे विविध प्रकारांत वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये फिट किंवा झटका आल्यावर मेंदूचा कोणता भाग व किती प्रभावित झाला आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मुलांना विविध वयोगटांत वेगळ्या प्रकारचे फेफरे/झटके येऊ शकतात. अनेकदा अचानकपणे शुद्ध किंवा भान हरपणे आणि शरीर घट्ट होणे (जनरलाइज्ड टॉनिक सिझर्स), काही वेळेस भान हरपून/न हरपता थरथर किंवा शरीराची विचित्र हालचाल करणे (कॉम्प्लेक्स फोकल सिझर्स) तर काही वेळेस वेगळा आभास होणे, जसे की दृकश्राव्य घटना (सिम्पल फोकल सिझर्स) आणि शून्यात टक लावून बघणे (अबसेन्स/ डायलेप्टिक सिझर) असे प्रकार पहायला मिळतात. अपस्माराचा योग्य प्रकार समजण्यासाठी डॉक्टरांना एमआरआय, ईईजी आणि व्हिडिओ-ईईजी मॉनिटरिंगची आवश्यकता असू शकते.

एपिलेप्सीवर उपचारासाठी ३० हून अधिक औषधे आहेत. अपस्माराचा प्रकार जाणून घेतल्याशिवाय, एखादी व्यक्ती योग्य औषधे निवडू शकत नाही. ८०% मुले योग्यरित्या निवडलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरे होतात. परंतु, अनेक औषधे घेऊनही सुमारे २०% मुलांना झटके येणे थांबत नाही. अशा मुलांसाठी इतरही अनेक पर्याय आहेत. औषधांप्रमाणेच, हे उपचार सर्वच मुलांसाठी प्रभावी नाहीत. डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक योग्य उपचार निवडणे गरजेचे आहे. स्टिरॉइड्स ईईजी संबंधीत समस्या कमी करू शकतात, वैचारीक सुधारणा आणि फिट येणे थांबवू शकतात.

वॅगस नर्व्ह स्टिम्युलेशन (VNS) हे एक लहान उपकरण आहे, जे माचीसच्या काडीच्या आकाराचे आहे. हे छातीच्या त्वचेखाली ठेवले जाते. हे मेंदूच्या असामान्य क्रियांना शांत करते. फेफरे थांबवण्यासाठी मुलांमध्ये अचूक निदान करणे आवश्यक आहे, असेही डॉ खारकर यांनी स्पष्ट केले.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग