Dussehra Recipes 2024: सणासुदीला घरी अनेक वेळा मिठाईसाठी काहीतरी खास बनवण्याची विनंती केली जाते. अशा वेळी अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवावे जे वेगळे, खास आणि चविष्टदेखील असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही शाही तुकडा किंवा शाही टोस्ट बनवण्याचा पर्याय निवडू शकता. क्वचितच कोणी असेल ज्याला हे आवडत नसेल.हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यामुळेच यंदा दसऱ्याला तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. प्रत्येक वेळी श्रीखंड पुरी खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल, तर हा पदार्थ तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. चला तर मग या पदार्थाची एकदम सोपी रेसिपी जाणून घेऊया...
-ब्रेड स्लाइस - ८
-पाणी - १/3 कप
-वेलचीपूड – १ चमचा
-दूध - ३ कप
-काजू - १० चिरून
-पिस्ता - १० चिरून
-तूप- अर्धी वाटी
-साखर - १/३ कप
-केसर - ६ काड्या
-मोठी वेलची - २ चिमूट
-बदाम - १० चिरून
-साखर - २ टेबलस्पून
शाही तुकडा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी आणि साखर गरम करण्यासाठी ठेवा. उकळी येताच त्यात केसर टाका. घट्ट पाक तयार झाल्यावर गॅस बंद करून भांडे बाजूला ठेवा. आता एका कढईत दूध मध्यम आचेवर उकळत ठेवा. लक्षात ठेवा की, मध्ये मध्ये दूध ढवळत राहा नाहीतर ते तळाला लागेल. आणि त्याचा जळका वास येईल. आता दूध थोडेसे दाटसर झाल्यावर त्यात वेलची पूड आणि साखर घालून मिक्स करा. यानंतर, आणखी ५ मिनिटे सतत ढवळत दूध गरम करा. यानंतर दूध गॅसवरून काढून बाजूला ठेवा. आता ब्रेड घ्या आणि त्याच्या कडा कापून वेगळ्या करा. त्याचे त्रिकोणी आकाराचे दोन तुकडे करा.
यानंतर गॅसवर तवा ठेवा. त्यात देशी तूप घालून ब्रेड दोन्ही बाजूंनी हलकेच कुरकुरीत व सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर एक मिनिटभर तयार पाकामध्ये भिजवून ठेवा. आता एका सर्व्हिंग डिशमध्ये ब्रेड स्लाइस व्यवस्थित ठेऊन घ्या. त्यावर तयार केलेले दूध घाला आणि चिरलेल्या बदाम आणि पिस्त्याने सजवा. अशाप्रकारे तुमचा शाही तुकडा तयार आहे.
संबंधित बातम्या