पुणे: कामाचे वाढते तास, ताण-तणाव आणि जीवनशैलीतील बदल हे त्या जोडप्यांच्या नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम करतात. ज्यामुळे नात्यातील जवळीकता कमी होऊन मानसिकदष्ट्या ताण येतो आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात आणि गर्भधारणा करण्यात समस्या येतात. अशा जोडप्यांना एआरटी प्रक्रियेची( कृत्रिम गर्भधारणा) मदत घेतल्याने गर्भधारणेस मदत होऊ शकते.
हल्ली कामाचे वाढते तास आपल्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणते ज्यामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकवा जाणवतो. कामाचे वाढते तास, तणाव आणि जीवनशैलीतील बदल जोडप्यांच्या एकूण आरोग्यावर परिणाम करते. जेव्हा शारीरिक आणि भावनिक आरोग्य बिघडते तेव्हा गैरसमज, ताण आणि अगदी नातेसंबंधातही असंतोष निर्माण होऊ शकतो आणि एकुणच गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. कामाच्या अनियमित शिफ्टमुळे एकमेकांना वेळ देता न येणे हा देखील एक चिंतेचा विषय ठरत आहे.
तणावामुळे निर्माण होणारे कॉर्टिसोलसारखे संप्रेरक हे कामवासनेवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे जोडीदारांना जवळीक साधणे कठीण होते. २७ ते ३५ वयोगटातील १० पैकी ६ जोडपी तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे जवळीकता कमी होण्याची तसेच कामवासना कमी होण्याची तक्रार करतात आणि त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या एआरटी पध्दतीचा वापर करुन पाहण्याचा सल्ला दिला जातो, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी आठवड्यातून ४ ते ५ जोडप्यांना या समस्या येत असल्याचे पाहते अशी प्रतिक्रिया डॉ. पद्मा श्रीवास्तव( प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे) यांनी स्पष्ट केले.
कामाच्या अनियमित वेळा, वाढते तास आणि ताणतणाव हा जोडप्यांना अनेकदा नातेसंबंधात जवळीक आणि भावनिक संबंध राखण्यात अडचण निर्माण करतो. एकमेकांसोबत दर्जेदार वेळेचा अभाव हा गैरसमज, भावनिकदृष्ट्या अलिप्त राहणे आणि संघर्षास कारणीभूत ठरू शकतो आणि नातेसंबंध आणखी दुरावतात. अनेक जोडप्यांना चिंता, थकवा, निराशा, एकटेपणा जाणवू शकतो आणि यामुळे त्यांच्या नात्याचा पाया कमकुवत होऊ शकतो.
सतत ताणतणावात राहिल्याने कॉर्टिसॉलची पातळी वाढते, जे प्रजनन संप्रेरकांमध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे महिलांमध्ये ओव्हुलेशन आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्तेवर परिणाम होतो. झोपेमुळे प्रजननक्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो आणि गर्भधारणेदरम्यान अन्क आव्हानांचा सामना करावा लागतो. १० पैकी ७ जोडप्यांना काम-जीवन संतुलन राखण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशी प्रतिक्रिया नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे येथील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. निशा पानसरे यांनी व्यक्त केली.
डॉ. पद्मा पुढे सांगतात की, तणावाचे व्यवस्थापन करणे, भावनिक आणि शारीरिक आरोग्य चांगले रहावे यासाठी काम आणि घर या दोन्हींमध्ये समतोल राखावा. योग्य नातेसंबंधांसाठी जोडीदारसोबत खुला संवाद साधावा.
डॉ. निशा पानसरे पुढे सांगतात की, गर्भधारणेच्या शक्यता सुधारण्यासाठी,जोडप्यांनी संतुलित जीवनशैली राखणे गरजेचे आहे. पुरेशी झोप, पोषक आहार आणि कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होणे हे प्रजनन आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. योग, ध्यान किंवा समुपदेशन यासारख्या विश्रांती तंत्रांद्वारे ताणतणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने प्रजनन समस्या ओळखण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यास मदत होऊ शकते. गर्भधारणा साध्य करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना प्रजनन सल्लागार इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF), इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) चा सल्ला देतात.
संबंधित बातम्या