DR. APJ Abdul Kalam: जगभरात लोकप्रिय असलेले आणि मुलांचे लाडके संशोधक, राष्ट्रपती आणि व्यक्ती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. डॉ. अब्दुल कलाम विज्ञान जगतात 'मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जात होते. तर राजकीय वर्तुळात ते राष्ट्रपती म्हणून ओळखले जात होते. डॉ. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य एखाद्या अप्रतिम उर्जेसारखे होते. देशातीलच नव्हे तर जगभरातील तरुणांसाठी ते एक खरे प्रेरणास्थान आहेत. आपल्या आयुष्यात त्यांनी वर्तमानपत्र विकण्यापासून ते भारताचे प्रथम नागरिक होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील धनुषकोडी गावात झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. अबुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. कलाम यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. डॉ. कलामांनी आयुष्यात नेहमीच कोणतीही गोष्ट शिकण्याला महत्त्व दिले. शिकण्यासाठी कोणतेही वय नसते किंवा वयाचे बंधन नसते हे त्यांनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवले आहे. ते लहानपणी वृत्तपत्रे विकायचे. कारण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांचे वडील जैनुलब्दीनही फारसे शिकलेले नव्हते. डॉ. कलामांना पाच भाऊ-बहिणी होत्या. लहानपणापासूनच त्यांच्यात शिकण्याची आणि काहीतरी करण्याची जिद्द होती.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना खरे तर वैमानिक बनायचे होते. मात्र त्यांना विज्ञान जगतात खरी ओळख मिळाली. त्यांनी १९५० मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून स्पेस सायन्समध्ये पदवी पूर्ण केली. या पदवीनंतर, ते भारतीय संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेत दाखल झाले. जिथे त्यांनी हॉवरक्राफ्ट प्रकल्पावर काम केले. त्यानंतर १९६२ मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये आले. याठिकाणी कलामांनी अनेक उपग्रह प्रक्षेपण प्रकल्पांमध्ये आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली. आजही वैज्ञानिक जगतात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा प्रत्येकालाच कौतुक आणि अभिमान आहे.
१) प्रत्येक व्यक्तीजवळ एकसारखे व्यक्तिमत्व नाही. परंतु आपल्या व्यक्तिमत्वावर कष्ट घेऊन आपली प्रतिमा निर्माण करण्याची संधी प्रत्येकाजवळ आहे.
२) पहिल्या यशानंतर कधीच आराम करू नका. कारण जर दुसऱ्या प्रयत्नात अपयश मिळाले तर सर्वांना वाटेल की पहिले यश नशिबाने मिळाले होते.
३)प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख येते. दुःखाच्या काळात तुमच्या धैर्याची परीक्षा असते. याकाळात तुम्ही धैर्य दाखवाल तर लवकरच त्या परिस्थितीतून बाहेर पडाल.
४)यशस्वी होण्याचा निश्चय दृढ असेल तर तुम्हाला कधीच अपयश मिळणार नाही.
५)स्वप्न पाहणे आवश्यक आहे. मात्र फक्त स्वप्न न पाहता एखादे लक्ष निश्चित करून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या