Tips to Take Care of Health During Monsoon: पावसाळा एन्जॉय करण्यासोबत आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरही पावसाळ्यात आरोग्याला विशेष जपण्याचा सल्ला देतात. नवी मुंबई येथील मोरलवार चाइल्ड केअर हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट पीडिअॅट्रिशियन डॉ. सदानंद शेट्ये म्हणाले, "पावसाळ्यामध्ये ताप, घसा बसणे, पोटात कळा येणे अशा विविध प्रकारच्या समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे ६० टक्के वाढ होते. या ऋतूमध्ये सर्वत्र अशी आजारपणे दिसून येतात. हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आणि वेळच्या वेळी निदान करून घेणे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
अबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डिरेक्टर डॉ. जेजो करनकुमार सांगतात “पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या अधिक असतात. या आजारांबद्दल जाणून घेणे, ते कसे टाळायचे आणि स्वतःची चांगली काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान करून डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास आणि पावसाळ्याचा आनंद घेता येईल.”
सर्दी आणि फ्लू - पावसाळ्यातील दमटपणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रभाव वाढतो. घसा बसणे, ताप, सांधे दुखी, स्नायू दुखी, डोकेदुखी, मळमळणे, डायरिया अशा समस्या पावसाळ्यात उद्भवतात. सर्दीच्या तुलनेत फ्लूचा शरीरावर गंभीर परिणाम होतो.
फंगल इन्फेक्शन - पावसाळ्यात सर्वत्र ओलावा असतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. बुरशीजन्य संसर्ग वाढण्याची शक्यता पावसाळ्यात अधिक असते. ॲथलिट्स फूट, रिंगवर्म आणि यीस्ट इन्फेक्शन होते. शरीराला खाज येणे, त्वचा लाल होणे आणि सूज येणे ही यांची लक्षणे आहेत.
पोटाच्या समस्या - पावसाळ्यात हवामानातील गारव्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे आपल्याला आहराकडे विशेष लक्ष द्यावे लागेत. दूषित पाणी आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने डायरिया आणि फूड पॉयझनिंगसारखे आजार उद्भवतात. आतड्याचे आरोग्य धोक्यात येते. पोटात दुखणे, मळमळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
मलेरिया आणि डेन्ग्यू - पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे जंतूंची पैदास होते. यामुळे आपले आरोग्य बिघडते. जगभरात डेंग्यूचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. ताप, हुडहुडी भरणे आणि घाम येणे ही मलेरियाची प्रमुख लक्षणे आहेत. तर ताप, गंभीर डोकेदुखी, डोळे दुखणे, स्नायू दुखणे आणि शरीरावर चट्टे येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत.
स्वच्छता राखा - पावसाळ्यात आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. कारण घाणीमुळे मोठ्या प्रमाणात यामुळे रोगराई पसरते. साचलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करा. आपल्या हातांची विशेष स्वच्छता करा. त्वचा कोरडी ठेवा. मोकळे हवेशीर कपडे घाला. आपली नखे कापा आणि स्वच्छता ठेवा.
समतोल आहार घ्या - पावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. परिणामी आजारांशी लढायला शक्ती मिळते. कितीही मोह झाला तरीही रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा आणि त्याऐवजी घरामध्ये शिजविलेले ताजे अन्न खा. यामुळे जंतु संसर्गाचा धोका कमी होईल. नेहमी उकळलेले आणि गाळलेले पाणी प्या. व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आपल्या आहारात समावेश करा.
सक्रिय रहा - कितीही पाऊस असला तरी व्यायाम चुकवू नये. बाहेर जाता येत नसल्यास घरी योगासने करावी. व्यायामामुळे स्नायू आणि हाडे बळकट राहतील. तसेच चांगली झोप लागेल. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करा - पावसाळा सुरू होण्याआधी फ्लूचे इंजेक्शन घेतल्याने अशा आजांपासून व त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतींपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)